

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची बाब आढळून आली आहे. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या छापामारीमध्ये सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सोनगीर मधील एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये बिनबोभाटपणे बनावट दारू तयार होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष का गेले नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. विशेषता हा कारखाना सुरू केल्या प्रकरणात एक आरोपी झाला असला तरी मुख्य तस्कर कोण आहे, याबाबत पोलीस तपास सुरू झाला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. त्यामुळे पोलीस पथकाने या वसाहती मधील प्लॉट क्रमांक ए 53 मध्ये छापा टाकला. यावेळी त्यांना घटनास्थळी बनावट देशी दारू तयार करण्याचा मिनी कारखाना सुरू असल्याची बाब निदर्शनास आली.
पथकाने घटनास्थळावरून सुमारे ५ लाख रु.किं.चे बॉटलला लेबलिंग व बुच पॉकिंग करणारे स्टिलचे इलेक्ट्रीक चैनल मशिन, सुमारे १,लाख ५० हजार रु.किं.चे पाण्याचे आर.ओ. प्लॉट मशिन , सुमारे २५ हजखर रु.कि.चे 5 नग पांढ-या रंगाच्या पाण्याच्या टाक्या, सुमारे १० हजार रु.किं. चे पांढ-या रंगाच्या लहान पाण्याच्या 5 टाक्या , ३० हजार रु.किं.चे मोटार असलेली ग्रॅन्डर मशिन सुमारे ५,६०० रु.किं.चे वेगवेगळ्या रंगाचे २८ नग प्लॅस्टिकचे ट्रे , सुमारे ५,लाख ३२ हजार रु.किं.चे देशी दारु बॉबी संत्रा, झाकणावर संजीवनी, त्यावर आरव्हीबी नं. १०७ जून २०२६ एल ५ असे छापलेले दारुचे १३३ बॉक्स जप्त करण्यात आले.
सुमारे १,लाख ४ हजार रु.कि. चे देशी दारु भिंगरी संत्रा नं ०१ चे २६ बॉक्स, सुमारे ४ हजार रु.कि.चे देशी दारु टैंगो पंच, दारुचा १ बॉक्स , सुमारे ४ हजार रु.किं.ची एक जुनी पाण्याची मोटर , ३० हजार रु. किं. चे पांढ-या रंगाचे गोणीमधील दारुच्या बाटलीचे बुच असलेले ६ नग बॉक्स , असा मुद्देमाल आढळून आला आहे. ही बनावट दारू सोनगीर येथील रहिवासी चंद्रकांत धुडकु बिरारी नामक व्यक्तीच्या ताब्यात आढळून आली. त्यामुळे त्यांच्या विरोधात बिएनएस कायदा कलम २२३, २७४, २७५, ३ (५), सह महाराष्ट मदय निषेध अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई सह ८१ व ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट दारू तयार करण्याच्या या मिनी कारखान्यांमध्ये कोपरगाव येथील साखर कारखान्याचे माध्यमातून तयार होणाऱ्या दारूचे बाटलीचे लेबल, बूच आणि पुठ्ठ्याचे छापील बॉक्स आढळून आले आहेत . त्यामुळे आता या तस्करी मध्ये मोठा मासा सहभागी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे असल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे हा मोठा मासा गळाला लावण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केले आहेत . मात्र औद्योगिक वसाहती मध्ये अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याची बाब एमआयडीसी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास येऊ नये याबाबत आश्चर्य व्यक्त होते आहे.