धुळे : धुळे शहर आणि परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित समस्येवर आता दिलासा मिळणार आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी वीज कंपनीच्या शहरातील रिक्त सहाय्यक अभियंते (सेक्शन इन्चार्ज) पदांवर नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित विभागांमध्ये सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती पूर्ण झाली असून देखभाल व दुरुस्तीच्या प्रलंबित कामांना गती मिळाली आहे.
शहरासह महापालिकेच्या हद्दवाढीतील गावांमध्ये काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. नागरिकांसह उद्योजकांना याचा मोठा फटका बसत होता. पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा अभाव आणि रिक्त पदांमुळे ही समस्या अधिक गंभीर झाली होती. आमदार अग्रवाल यांनी मार्चमध्ये ऊर्जा राज्यमंत्री यांची भेट घेऊन विशेष बैठक घेतली होती. बैठकीत शहरातील विविध वीज विभागांतील रिक्त पदांची माहिती देत समस्यांकडे लक्ष वेधले होते. ऊर्जा विभागाने तातडीने कार्यवाही करत सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती केली असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होणार आहे.
याशिवाय, वीजचोरी रोखणे व अतिउच्च दाबाच्या वीजतारांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी शहरात एबी केबल टाकण्याची मागणी केली होती. त्यावरही मंत्री बोर्डीकर यांनी सकारात्मक दखल घेतली. त्यामुळे स्टेशन रोड, मिल परिसर, डेअरी परिसर, साक्री रोड, मोगलाई आदी भागांमध्ये एबी केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.