धुळे : येथील शासकीय विश्रामगृहातील खोलीत रोकड सापडली. यावेळी चौकशीच्या मागणीसाठी खोलीबाहेर बसलेले माजी आमदार अनिल गोटे. दुसर्‍या छायाचित्रात खोलीत रोकड मोजत असताना अधिकारी.  
धुळे

Dhule News : धुळे रोकड प्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी सुरू; मात्र अद्यापही गुन्हा दाखल नाही

Dhule cash case : स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या पदाबाबतही संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत सापडलेल्या बेहिशोबी रकमेची जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणात प्राथमिक चौकशी सुरू असून ही चौकशी १४ दिवसात संपेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आयकर विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये देखील या चौकशी संदर्भात चर्चा झाली आहे. अद्याप या रकमेवर कोणीही दावा केलेला नसून कठीत स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नियुक्ती संदर्भात मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये मोठी रक्कम असल्याची माहिती मिळाल्याने शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी या खोली बाहेर ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान धुळे ते मुंबई दरम्यान पोलीस, अँटी करप्शन यासह संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती देण्यात आली. मात्र, तब्बल सहा तासानंतर पोलीस व महसुल विभागाचे पथक घटनास्थळावर पोहोचले. यानंतर पहाटे तीन वाजेपर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते. या खोलीतून तब्बल एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये आढळून आले. या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. तर या रकमे संदर्भात आयकर विभागाला देखील माहिती देण्यात आली. मात्र आज सायंकाळपर्यंत या रोकड प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र 22 मे रोजी सुरू झालेली प्राथमिक चौकशी 14 दिवसात संपेल, असा अंदाज अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान ही रोकड विधान मंडळातील आमदारांच्या अंदाज समितीला लाच म्हणून देण्यासाठी गोळा केली गेली असल्याचा खळबळ जनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला .त्याचप्रमाणे ही रोकड समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी गोळा केल्याचे देखील आरोप करण्यात आले. मात्र किशोर पाटील यांची स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यास विधानमंडळ स्तरावर मंजुरीच मिळाली नसल्याचे देखील आता बोलले जात आहे. असे असले तरी धुळे येथील बांधकाम विभागाला खोल्यांसंदर्भात झालेल्या पत्रव्यवहारात किशोर पाटील यांचा स्वीय सहाय्यक म्हणून उल्लेख आहे. तर विश्रामगृहातील एक खोली १५ मे रोजी किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित करण्यात आल्याची पावती देखील आढळून येते आहे. त्यामुळे किशोर पाटील यांच्या स्वीय सहाय्यक पदाबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT