

धुळे : धुळे येथील विश्रामगृहाच्या खोलीत कोट्यवधी रुपये असल्याचे कळवूनही घटनास्थळी पोहोचण्यासाठी पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला साडेपाच तास लागले. यंत्रणा सत्तेपुढे लाचार झाली आहे. ते पारदर्शक तपास करूच शकत नाहीत. तसेच गृह विभागाकडून त्यांना प्रकरण दडपण्याचे आदेश असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच पोलिस चौकशीवर आपला विश्वास नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान मंडळ अंदाज समिती बुधवारी (दि.21) धुळे दौऱ्यावर असतानाच शासकीय विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खाेलीत एक कोटी 84 लाख 84 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली होती ही रक्कम समिती सदस्यांना वाटण्यासाठी अधिकाऱ्यांनी जमा केल्याचा आरोप करत गोटे यांनी खोली बाहेर आंदोलन केले आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. मात्र, गोटे यांनी थेट तपास यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गोटे म्हणाले की, या प्रकरणात विश्रामगृहातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचे षडयंत्र सुरू असून, जनतेला पुन्हा एकदा मूर्ख बनवविले जात असल्याची टीका त्यांनी केली. तसेच देशभरात या प्रकरणी चर्चा सुरू असताना अद्याप जिल्हा पोलिसांकडे याबाबत कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. ही वस्तुस्थिती राज्याच्या गृहखात्याचा कारभार कोणत्या दिशेने सुरू आहे हे दाखविणारा आहे. विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा, तक्रार अर्ज नसताना पोलिस तपास कसे करू शकतात, असा सवाल गोटे यांनी उपस्थित केला आहे. याबद्दल आपण स्वतः चौकशी केली असता, गुन्ह्याची नोंद नसल्याने आम्ही माहिती देऊ शकत नाही, असे उत्तर दिले जात आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री कार्यालयातूनच तपासाचे सूत्रसंचालन केले जात असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.
पोलिसांनी खोलीचे कुलूप तोडण्यापूर्वी बंद कुलुपाचा पंचनामा करणे, त्यावरील बोटांचे ठसे घेणे, रूममधील जागेचा स्वतंत्र पंचनामा करणे, भरलेल्या बॅगा व रिकाम्या बॅगांचा पंचनामा करणे आवश्यक होते. मात्र, यापैकी कुठलीही गोष्ट न करता, त्यांनी नोटा मोजल्या. काही प्रेसकट नोटा होत्या. त्या नोटांच्या नंबरवरून त्या कुणाच्या खात्यातून पैसे निघाले हे तपासात सापडले असते. मात्र, पोलिस हेतूतः सगळ प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गोटे यांनी केला.
सीआयडी, ॲण्टी करप्शन, धुळे पोलिस यांची प्रतिमा जनमानसांत मलीन झाली आहे. यात विश्रामगृहाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील फुटेज जप्त का केले नाही. असे सांगतानाच या प्रकरणात विधानसभा अंदाज समितीच्या सर्व आमदारांना आरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी मी खंडणी गोळा करतो असा आरोप केला आहे. मात्र, मी आतापर्यंत कोणताही पुराव्याशिवाय कोणताही आरोप केलेला नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोपांबद्दल चव्हाण यांच्याविरुद्ध न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असून यात भरपाई म्हणून संबंधितांच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
अनिल गोटे, माजी आमदार