धुळे

Dhule news | बोगस बियाणे विक्री करून फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देखील करण्यात आली आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस कृषी बियाण्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केली आहे.

धुळे जिल्ह्याच्या शाखेच्यावतीने जिल्हा कृषी अधिकारी सुरज जगताप यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. काही विक्रेते कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करीत आहेत. गुजरातमधील सुरत, अहमदाबाद आदी भागांतून अनधिकृतरीत्या आणली जाणारी अशी बियाणे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरत आहेत.

पेरणीनंतर उगवण न होणे, उत्पादन घटणे किंवा संपूर्ण पीक वाया जाण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैसा वाया जात आहे. सध्या अपुरा पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना काही विक्रेते त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, त्यांचे परवाने रद्द करावेत तसेच दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, महेश पाटील, कैलास देसले, नितीन जाधव, भूषण बागुल, अनिल देसले, विलास पाटील, उल्हास पाटील यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT