Food Adulteration: दुधात कपडे धुण्याचा सोडा, तुपात डालडा

भेसळखोरीने आरोग्य धोक्यात : जिल्ह्यात भेसळखोरांचे रॅकेट
Food Adulteration
Food Adulteration
Published on
Updated on
आदेश खताळ

सातारा : स्वयंपाकघराचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे दूध, तूप, खवा यामध्ये जीवघेणी भेसळ होत आहे. दुधामध्ये पाणी मिळसणे सामान्य झाले असून भेसळखोर आता त्यामध्ये युरिया, स्टार्च आणि डिटर्जंट मिसळू लागले आहेत. तुपात डालडा तर खव्यात रव्याची भेसळ केली जात आहे. नफेखोरीसाठी भेसळखोरांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळीचा सपाटा लावला आहे. प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये हानिकारक रसायने वापरली जात असल्याने जिल्ह्यातील भेसळखोरांवर कारवाई करावी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

सद्य स्‍थितीत आपण दूध पितो की विष? असा प्रश्न आता पडू लागला आहे. दूध 'ए वन' की 'ए टू' प्रकारातले आहे, यापेक्षा ते विषमुक्त आहे का? हाच महत्त्वाचा प्रश्न सतावू लागला आहे. या दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये विविध रसायनांची भेसळ केली जात आहे. दुधामध्ये पाणी मिसळण्याकडे सहजतेने पाहिले जाते. भेसळखोरांनी त्यापुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारची रसायचे दुधात मिसळण्यास सुरूवात केली आहे. दुधात डिटर्जंट मिसळल्यामुळे कृत्रिम फेस येतो आणि ते ताजे वाटते. दुधातील प्रथिने (एसएनएफ) प्रमाण वाढवण्यासाठी शेतात वापरला जाणारा युरिया मिसळला जातो.

याचबरोबर तुपामध्ये वनस्पती तेल, पामतेल आणि डालडा मिसळून ते शुद्ध तुपाच्या किंमतीत विकले जाते. खवा किंवा माव्यामध्ये स्टार्च आणि रवा मिसळून त्याचे वजन वाढवले जाते. दूध आणि दूग्धजन्य पदार्थांमधील भेसळीमागे नफेखोरी हे मूळ कारण आहे. शुद्ध दुधाचा उत्पादन खर्च अधिक असताना बाजारात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे कमी दरात जास्त माल पुरवण्यासाठी भेसळीचा मार्ग धरला जात आहे.

बाजारात दुधाची प्रचंड मागणी असताना पुरवठा कमी होणे, दुधाळ जनावरांची घटती संख्या, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न करणे, भेसळखोरी पकडल्यानंतर होणारी सौम्य शिक्षा, राजकीय दबाव या कारणांमुळे भेसळीला वाव मिळत आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, कोरेगाव, खंडाळा व फलटण तालुक्यात दूध भेसळखोरी करणारी मोठी साखळी कार्यरत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रावर दुधात पाणी व रसायने मिळसली जातात. त्यानंतर दूध वितरण केंद्रांवर किंवा कुलर पॉईंटवर दुधावर प्रक्रिया होते आणि तूप, खवा, पनीर बनवले जाते. त्यानंतर बनावट ब्रँडच्या नावाने किंवा नामांकित ब्रँडचे खोटे पॅकिंग वापरून बाजारात बनावट दुधाची विक्री केली जाते. हे भेसळखोर कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात. या साखळीत संकलक, वाहतूकदार, प्रक्रिया केंद्रचालक आणि विक्रेते असे सर्वजण सामील असतात. बर्‍याचदा राजकीय दबावामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कारवाई करण्यात अडथळे येतात.

या भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. दुधात डिर्जंट मिसळल्यामुळे पोटाचे विकार व लिव्हरचे नुकसान होते. युरियामुळे किडणीवर ताण येऊन तिचे प्रचंड नुकसान होते. पामतेल व डालडा मिसळल्यामुळे ह्दयविकार होऊन शरीरातील कोलेस्टोरॉल वाढते. स्टार्च व रव्यामुळे पचनाचे विकार वाढतात. मधुमेहींना याचा सर्वाधिक धोका असतो. लहान मुले, गर्भवती माता आणि वृद्धांसाठी भेसळीचे दूध अत्यंत धोकादायक आहे. असे भेसळीचे दूध सतत खाल्ल्याने कॅन्सरचा होण्याचा धोका असतो.

भेसळखोरीला लगाम घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून सतत धाडी टाकणे, अचानक भेटी देऊन तपासणी करणे, अन्न चाचणी प्रयोगशाळांची उभारणी प्रत्येक जिल्ह्यात करणे, प्रयोग शाळांमध्ये पुरेशा स्टाफची व्यवस्था करणे, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे, भेसळखोरांना किमान दहा वर्षे सक्तमजुरी व मोठ्या दंडाची शिक्षा देणारी तरतूद करणे आवश्यक आहे. भेसळ करणे हा गुन्हा असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. शासन आणि प्रशासनाने एकत्र येऊन भेसळखोरांचे रॅकेट उद्धवस्त करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news