धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे, पुणे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे 22 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 33 मोटरसायकली जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
या गुन्ह्याची माहिती देताना समवेत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांची उपस्थिती होती. धुळे येथील गरुड कॉम्प्लेक्स समोरून जितेंद्र पाटील यांची मोटर सायकल चोरीस गेली होती. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी सुरू केला. यात त्यांना हा गुन्हा साक्री तालुक्यातील अट्टल चोरट्याने केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, तसेच संजय पाटील, मायुस सोनवणे, सदेशिंग चव्हाण, संतोष हिरे, धर्मेंद्र मोहिते, योगेश जगताप, किशोर पाटील, अतुल निकम, हर्षल चौधरी आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाला या चोरट्याच्या मागावर रवाना केले.
दरम्यान साक्री तालुक्यातील बळसाने येथून पथकाने योगेश शिवाजी दाभाडे या चोरट्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून पाच जिल्ह्यांमधून मोटारसायकलींची चोरी केल्याची बाब निदर्शनास आली. या चोरट्याच्या ताब्यातून 33 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या चोरट्याच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील अंबड आणि गंगापूर तसेच धुळे व दोंडाईचा, जळगाव जिल्ह्यातील रामानंद आणि पारोळा पोलीस स्टेशन, पुणे येथील भोसरी व पिंपरी आणि हिंजवडी अशा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. या चोरट्याने या दुचाकी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे येथून चोरी केल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. प्राथमिक चौकशीत बत्तीस गुन्हे उघडकीस आले आहेत .
दरम्यान, नागरिकांनी चोरीस गेलेल्या मोटरसायकलीच्या कागदपत्र सादर करून चेसिस नंबर आणि इंजिन नंबर याची खात्री करून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून दुचाकी ताब्यात घ्याव्यात, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. दरम्यान या चोरट्याच्या विरोधात पुणे येथे मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या गुन्ह्यात तो पुणे पोलिसांना हवा असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.