Dhule Ganja Seizure
धुळे: शिरपूर तालुक्यातील बभळाज गावाच्या शिवारात वन जमिनीवर गांजाची लागवड केल्याची बाब उघडकीस आली. थाळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी सुमारे 34 लाख 2 हजार रुपयांच्या गांजाची रोपे जप्त केली आहे. या प्रकरणात दोघांना अटक केली असून उर्वरित चौघे फरार झाले आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बभळाज गावाचे शिवारात सोज्यापाडाचे मागे डोंगरा लगत प्रतिबंधीत असलेला गांजा वनस्पतीची लागवड केली आहे. अशी बातमी सपोनि शत्रुघ्न पाटील यांना मिळाल्यावरुन छापा कारवाई कामी लागणारे सर्व आवश्यक साधन सामुग्री घेऊन नायब तहसिलदार रविंद्र कुमावत, तसेच पथकाने या ठिकाणी जाऊन खात्री केली. तेथे गांजा वनस्पतीची लागवड केल्याचे दिसून आल्याने छापा कारवाई केली. पोलीस आल्याचे पाहुन रखवालीचे काम करणारे काही जण डोंगराळ भागात पळू लागले.
पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन त्यातील दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे गेंदाराम झिपा पावरा, रुपसिंग भावसिंग पावरा असे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन सदर गांजा लागवड केलेल्या शेताबाबत विचारले असता त्याने सांगितले की, ही वनजमीन असुन त्याने तसेच त्याचे साथीदार अमरसिंग थावऱ्या पावरा, डुबाडया ग्यानसिंग पावरा, कालुसिंग सुकलाल पावरा, प्रविण गेंदाराम पावरा व इतर असे सर्वांनी मिळून गांजाची लागवड केली आहे, अशी माहिती दिली.
या शेतात छापा कारवाई दरम्यान ३४ लाख २ हजार रुपये किंमतीचा ९७२ किलो वजनाची गांजाची झाडे मिळुन आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आली. ताब्यातील दोन नमुद आरोपी व मुद्देमाल पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. पोकॉ मुकेश पावरा यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली. त्यावरुन थाळनेर पोलीस स्टेशन येथे एन.डी. पी. एस. कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गेंदाराम झिपा पावरा, रुपसिंग भावसिंग पावरा यांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
तर आरोपी अमरसिंग थावऱ्या पावरा, डुबाडया ग्यानसिंग पावरा, कालुसिंग सुकलाल पावरा, प्रविण गेंदाराम पावरा व इतर काही जण हे फरार आहेत. या गुन्हयाचा तपास सपोनि शत्रुघ्न पाटील हे करीत आहेत. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे.