Chalisgaon Sub Registrar Office Bribe Case
सोनगीर (धुळे) : धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चाळीसगाव येथे लाच मागणाऱ्या सुनील शिवदास निकम ऊर्फ नाना (वय ४७, रा. आनंदवाडी, चाळीसगाव) याला खरेदी खत व सूची क्रमांक २ च्या प्रमाणित प्रती देण्यासाठी 9 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या प्लॉटच्या खरेदीखत व सूची क्रमांक २ च्या प्रमाणित नक्कल मिळवण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या सुनील निकम याने या प्रती देण्यासाठी तक्रारदाराकडे ९ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी त्याने ५ हजार रुपये आधीच घेतले व उर्वरित ४ हजार रुपये नक्कल देताना द्यावे लागतील असे सांगितले.
तक्रारदाराने याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून धुळे ACB पथकाने सापळा रचला, त्यानुसार चाळीसगाव येथे सुनील निकम ऊर्फ नाना याला उर्वरित ४ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाई दरम्यान पंच साक्षीदार उपस्थित होते.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून सदर कारवाई ACB धुळे चे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.