धुळे

धुळे : बळसाणे येथे मृतावस्थेत सापडला सहा वर्षांचा बिबट्या

गणेश सोनवणे

पिंपळनेर (जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील बळसाणे येथे शेतात सहा वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात शेतकरी व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

काल दुपारी 2.30 वाजता भुरा रावल हे शेतातून घराकडे येत असताना त्यांना शेतात बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी ही माहिती गावातील ज्ञानेश्वर हालोरे व पोलिस पाटील आनंदा हालोरे यांना दिली.

यानंतर, ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्याची माहिती तहसीलदार साहेबराव सोनवणे व वनविभागाचे वनक्षेत्रपाल विनायक खैरनार यांना देण्यात आली. घटनास्थळी वनपाल राजेंद्र जगताप, वनपाल संदीप चव्हाण, वनरक्षक आबा बागुल, दौलत खैरनार, संजय पाटील, विक्रम चव्हाण, दीपक सोनवणे, भैय्या धिवरे, पुंजाराम धनुरे, वामन महिरे, योगेश देसले आदी उपस्थित होते.

मृत बिबट्याचे दात, चारही पायाचे पंजे व नखे तसेच कातडी सुस्थितीत आढळून आली. वनसंरक्षक डॉ.यशवंत बहिराम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शवविच्छेदनात बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बिबट्या हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा वन्यप्राणी आहे. या घटनेमुळे बिबट्यांना मिळणाऱ्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वन्यप्राण्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी वनविभागाने पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT