धुळे : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी धुळे पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आझाद नगर परिसरातील गोवंश हत्येच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या आठ व्यक्तींना ६ जून ते ९ जून या कालावधीत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.
बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर जनावरांची कुर्बानी दिली जाते. मात्र, गोवंश हत्या महाराष्ट्रात कायद्याने बंद असूनही काही भागांमध्ये या प्रकारांची पुनरावृत्ती होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींची यादी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आली होती.
२०१९ पासून गोवंश हत्येचे विविध गुन्हे नोंदवले गेलेल्या आठ आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यक्तींना चार दिवसांसाठी शहराबाहेर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोहम्मद कलीम मुक्तार अहमद कुरेशी – मौलवीगंज
सलमान अब्दुल मन्नान अन्सारी – फिरदोस नगर
जाकीर हुसैन उर्फ जाकीर काल्या – नाल्याजवळ
शेख जावेद शेख अजीज – आशियाना नगर
मोहम्मद शाबान अब्दुल हक्क अन्सारी – नंदीरोड
नियाज अहमद अब्दुल रशिद अन्सारी – माधवपूरा
मोहम्मद जुनैद मुख्तार अन्सारी – मक्का मशिदजवळ
अबरार अहमद अब्दुल सत्तार – माधवपूरा
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, आणि पोलीस उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोसई रविंद्र महाले आणि त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सहभागी होते.
पोलीस दलाची ही तात्काळ आणि कडक भूमिका गोवंश हत्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.