Dhule district water management
धुळे : धुळे व शिंदखेडा तालुक्यातील नदीकाठी असलेल्या गावातील पाणीटंचाई निवारण करण्यासाठी अक्कलपाडा धरणातून 220.00 दलघफूट इतक्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.
धुळे तालुक्यातील कुसुंबा, खेडे, वार, वरखेडी, मोराणे, भिलाणे, मुडावद, अकलाड मोराणे, धुळे, आर्वी, जापी, कौठळ-1, कौठळ-2, शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा, बेटावद, पढावद, अजंदे ब्रु, वाघोदे, तसेच अमळनेर तालुक्यातील मांडळ, मुडी प.डा, बोदर्डे, कळंबु, ब्राम्हणे, भिलाली, शहापूर, डांगर बु,एकतास, तांदळी, निम, जवखेडा वावडे, एकलहरे, लोण खु, व लोण ब्रु, या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच नदीकाठच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली असल्याने गावातील पाणी टंचाई निवारणार्थ अक्कलपाडा धरणातून 220 दलघफुट इतक्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.
पाण्याचे आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांवरील फळ्या काढण्यात याव्यात व पुन्हा पाणी अडविले जाणार नाही, याबाबत संबंधित गावकऱ्यांनी व शासकीय विभागांनी दक्षता घ्यावी. नदीपात्रात बंधाऱ्याजवळ शेतकऱ्यांनी शेती पिकांना पाणी देण्यासाठी टाकलेल्या मोटर्स पाणी सोडण्यापूर्वी काढून घ्याव्यात. नदीपात्रात केलेले मातीचे भराव बांध काढुन घ्यावेत. धरणातील पाणी संबंधित गावांपर्यत घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसिलदार, उपअभियंता ग्रामिण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., उपअभियंता पाटबंधारे विभाग, पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्तीकरित्या राहील.असे आदेशात नमुद केले आहे.
अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांनी आवर्तन सोडतेवेळी नदीकाठच्या गावातील नदीपात्रा लगतच्या व नदीपात्रातील, विहिरीवरील वीज पुरवठा बंद करावा, तसेच नदीपात्रात बंधाऱ्याजवळ शेतकऱ्यांनी शेती पिकांना पाणी देण्यासाठी टाकलेल्या मोटर्स पाणी सोडण्यापूर्वी अर्थात 12 मे पूर्वी काढून घेण्याबाबत लेखी सूचना निर्गमित कराव्यात. आवर्तन सोडण्यापूर्वी तहसिलदार, साक्री यांनी तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणांची तातडीने बैठक घ्यावी. असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.