मिरचीपूड आणि मसाल्यात भेसळ  
धुळे

धुळ्यातील औद्योगिक वसाहतीत मिरचीपूड, मसाल्यात भेसळ

पुढारी वृत्तसेवा

धुळे : दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या मसाला व मिरचीपूडमध्ये भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीवर छापा टाकून भेसळ असलेल्या मिरचीचा साठा ताब्यात घेतला असून ही कारवाई बुधवारी (दि.२५) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. भेसळयुक्त मिरची तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून तेथील अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

धुळे येथे खाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिरची पूड आणि मसाल्यात घातक रसायन आणि रंग मिसळले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या माहितीची खात्री केली. यानंतर औद्योगिक वसाहतीमध्ये मिरचीपूड तयार होत असलेल्या एका कंपनीच्या गाळ्यावर या पथकाने छापा टाकला. यात मिरचीपूडमध्ये भेसळ करणारे मोठे रॅकेट असल्याची बाब पोलिस पथकाच्या निदर्शनास आली.

या प्रकरणात प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. मुख्तार अन्सारी यांच्या टावर ब्रँड मसाल्याच्या कंपनीच्या भाड्याच्या गाळ्यामध्ये धुळ्यातील मुस्लिमनगर मध्ये राहणारा इमरान अहमद आणि मोहम्मद असीम हे दोघेही काम करीत होते. या दोघांच्या माध्यमातून मुंबई येथील मजिद बंदर येथून हानिकारक रंग आणि अन्य रसायन धुळ्यात आणले जात होते. यानंतर या भाड्याच्या कंपनीमध्ये मिरचीमध्ये भेसळ करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता.

प्राथमिक तपासानुसार १२० किलो लाल मसाल्यामध्ये आठ किलो भेसळयुक्त तेल आणि ४० किलो अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग व केमिकल मिसळले जात होते. यातून तयार झालेला मसाला ११० रुपये किलोने विकला जात होता. मात्र प्रत्यक्षात टावर ब्रँड मसाल्याची किंमत चारशे रुपयापर्यंत असल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे आली आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने भेसळयुक्त मिरची आणि मसाला तयार करणाऱ्या या कारखान्याला भेट दिली. यानंतर भेसळीचा सर्व प्रकाराची त्यांनी चौकशी केली. या संदर्भात आता कायद्यातील तरतुदीनुसार अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्राचारण करण्यात आले आहे .या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भेसळयुक्त मिरची आणि मसाला प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT