धुळे

धुळ्यात फटाक्याचा साठा ठेवलेल्या गोदामाला आग, अग्नि प्रतिबंध यंत्रणा कार्यान्वित नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड

गणेश सोनवणे

धुळे पुढारी वृत्तसेवा– धुळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागण्याची घटना आज दि. (21) घडली आहे. यात फटाक्यांच्या साठ्यासह खाद्य पॅकेटचा साठा देखील जळून खाक झाला आहे. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण केले असले तरीही औद्योगिक वसाहत प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ज्वलनशील पदार्थाचे गोदाम असून देखील या गोदाम चालकाने आगीवर नियंत्रण करणारी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित केली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेषता याकडे औद्योगिक वसाहतीने देखील कानाडोळा केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले आहे.

मोठे स्फोट -धूर अन् आगीचे लोळ आकाशात

  • गोदामात फटाक्यांचा साठा असल्याने मोठे स्फोट झाले.
  • धूर अन् आगीचे लोळ आकाशात दिसत होते.
  • यावेळी एकच धावपळ उडाली.

धुळे येथील मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याजवळ औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका गोदामाला अचानक आग लागली. या गोदामामध्ये फटाक्यांचा साठा ठेवलेला असल्यामुळे मोठे स्फोट होण्याची आवाज येऊ लागले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. धूर आणि आगीचे लोळ आकाशात दिसत असल्याने बघ्यांची देखील गर्दी झाली. आग लागल्याची माहिती मिळाल्याने मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील हे तातडीने घटनास्थळावर पोहोचले. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील पाण्याचा मारा करून या आगीवर नियंत्रण मिळवले.

फटाकेंसह खाद्यपदार्थांचा साठा जळून खाक

सदर गोदाम हे एका फटाका विक्री व्यापाऱ्याने भाडेतत्त्वावर घेतल्याची बाब निदर्शनास आली आहे. याच गोदामाच्या अर्ध्या भागामध्ये खाद्य पदार्थाचे पॅकेटचा साठा देखील ठेवण्यात आला होता. फटाके आणि खाद्यपदार्थाच्या साठा आगीत जळून खाक झाला. मात्र प्राथमिक अवस्थेत या गोदामात ज्वलनशील पदार्थ ठेवलेले असून देखील आगीवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा संबंधित फटाका विक्री व्यापाऱ्याने ठेवली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.

ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

विशेषतः औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल तसेच ऑइल निर्मिती करणारे अनेक कंपन्या आहेत. याबरोबरच प्लायवूड तसेच पशुखाद्य तयार करणाऱ्या कंपन्या देखील आहेत. या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीने देखील आगीवर नियंत्रण करणारी त्यांची स्वतःची यंत्रणा तत्पर ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच संबंधित कंपनीने अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे किंवा नाही याविषयीची पाहणी करण्याची जबाबदारी देखील औद्योगिक वसाहतीचे आहे. मात्र आज लागलेल्या आगीत औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वास्तविक पाहता सदर गोदाम भाडेतत्त्वावर देण्याची तरतूद आहे किंवा कसे ही बाब देखील औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाने तपासली नसल्याची प्रतिक्रिया या घटनास्थळावरील बघ्यांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT