धुळे

Dhule News: धुळे सत्र न्यायालयाकडून २०२३ मध्ये ३३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

अविनाश सुतार

धुळे, पुढारी वृत्तसेवा :  गंभीर गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे ,या हेतूने धुळे जिल्हा न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली. त्यात गेल्या वर्षभरामध्ये 31 गुन्ह्यांमधील 64 आरोपींना तसेच सात अपीलातील 20 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे. यातील तब्बल 33 जणांना जन्मठेपेची शिक्षा मिळवण्यात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर आणि त्यांच्या सहकारी सरकारी अभियोक्त्यांना यश आले आहे. विशेषता विशेष सरकारी वकील शामकांत पाटील यांनी नुकतीच विद्यार्थ्याच्या खुनाच्या प्रकरणात पाच जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा घेण्यात यश मिळवले आहे. Dhule News

धुळे येथील न्यायालयात भारतीय दंड विधान कलम 302 ,307, 376, 353, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा अशा विविध खटल्यातील आणि अपिलातील एकूण 84 आरोपींना दोषी धरून त्यांना वर्ष 2023 यात शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. या तब्बल 33 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्या आहेत. यातील काही खटले हे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होते. त्यात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सरकारी पक्षाच्या वकिलांनी पुराव्यांची शृंखला न्यायालयात सिद्ध करण्यात यश मिळवले. Dhule News

परिणामी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊन त्यांना तुरुंगात जावे लागले आहे. विशेष म्हणजे या काळात शिक्षा सुनावीत असताना ऐतिहासिक निकाल देखील धुळे न्यायालयात घोषित झाले आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे धुळे तालुक्यातील अनकवाडी येथे झालेल्या खुनाच्या प्रकरणातील खटल्यात एकाच गुन्ह्यातील सर्व 14 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांना विशेष यश मिळाले. तसेच धुळे येथील सनी साळवे या विद्यार्थ्याच्या खुनाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील शामकांत पाटील तसेच दराने येथील डॉक्टर प्रेमसिंग गिरासे खून खटल्यात सरकारी वकील गणेश पाटील यांनी आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यासाठी यश मिळाले आहे.

जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर, तसेच विशेष सरकारी वकील शामकांत पाटील त्याचप्रमाणे सरकारी वकील मधुकर पाटील, वैभव पुरोहित, अजय सानप, निलेश कलाल, गणेश पाटील, संजय मुरक्या, जगदीश सोनवणे, शुभांगी जाधव, भरत भोईटे यांनी देखील वेगवेगळ्या गुन्ह्यात केलेले युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील विविध दाखले सादर करून सरकारी पक्षाची बाजू साक्षीदारांच्या पुराव्यासह न्यायालयासमोर खंबीरपणे मांडली.

परिणामी गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्यात यश मिळाले .तसेच अन्यायग्रस्त आणि पीडितांना न्याय देखील मिळाला. या विविध खटल्यात गेल्या वर्षभरात पुरावे प्राप्त करण्यासाठी तपासी अंमलदार, पोलीस अधिकारी आणि पैरवी अधिकारी यांनी पुरावे गोळा करून सरकार पक्षाच्या वकिलांना मदतच केली. परिणामी आरोपींना तुरुंगात धाडण्यासाठी सरकार पक्षाला सक्षमपणे त्यांची बाजू मांडता आली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT