धुळे : पुढारी वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'मेरी माटी मेरा देश' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने योग्य नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत 'मेरी माटी मेरा देश'उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त विजय सनेर, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे, शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजादी का अमृत महोत्सवातंर्गत देशभरात 'मेरी माटी मेरा देश'उपक्रमाचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने देशभरात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करावे. ग्रामपंचायत विभागाने सर्व सरपंच यांची बैठक घेवून त्यांना कार्यक्रमाची माहिती द्यावी. वसुधा वंदन उपक्रमातंर्गत गावातील योग्य ठिकाण निवडून 75 वृक्षाच्या रोपवाटीकेसाठी वन विभागाने ग्रामपंचायतीस पुरेसे रोप उपलब्ध करुन द्यावेत. प्रत्येक तालुक्यातील महिला बचतगटांना मातीचे दिवे, कलश, ध्वज निर्मितीसाठी प्रोत्साहित करावे. पंचायत समिती क्षेत्रातील सर्व शासकीय इमारती, संस्थाच्या ठिकाणी पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयेाजन करावे. मातीचे दिवे वितरण, विक्रीची व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात व्यवस्था करावी, स्वस्त धान्य दुकानांमध्ये ध्वनीक्षेपकामार्फत कार्यक्रमा संदर्भातील ध्वनीमुद्रीत संदेश, जिंगल्स, आणि कार्यक्रमाची माहिती द्यावी. शाळा, महाविद्यालयांनी 'मेरी माटी मेरा देश'या उपक्रमांवर आधारित देशभक्तीपर, वीर जवानांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे तसेच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेवून कार्यक्रमाचे सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करावे.
पोलीस विभागाने 'मेरी माटी मेरा देश'जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी पथसंचलन करावे. महाराष्ट्र राज्य परिहवन महामंडळाने राज्य एस.टी महामंडळाच्या बसेसवर 'मेरी माटी मेरा देश'उपक्रमाची माहिती प्रसिद्ध करावी. प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यातील सर्व टोल नाके, चेक पॉईट ठिकाणी माहितीपत्रकांचे वाटप करावे. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यांनी जिल्हास्तरावर झालेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी. जिल्हा माहिती अधिकारी यांनी आकाशवाणी केंद्रावर शहीद झालेल्या वीरांची माहिती संबंधित कार्यक्रमाचे आयेाजन करावे. मुख्य ठिकाणी जाहिरात फलकांवर संदेश प्रसारीत करावे. नेहरु युवा केंद्राने तालुकास्तरावर जमा केलेली माती कलश कर्तव्यपथ, दिल्ली येथे घेवून जाण्याची व्यवस्था करावी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने जिल्ह्यातील शहीद वीर जवानांची गावनिहाय यादी तयार करुन गट विकास अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी.
तालुकास्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग, महानगरपालिका, नगरपालिका यांनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील, याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या.
हेही वाचा :