धुळे : पिस्तुल तस्करीप्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेले पिस्तुल दाखवताना धुळे पोलीस पथक.  
उत्तर महाराष्ट्र

धुळे : पिस्तुलांची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मध्य प्रदेशातून आणलेल्या पिस्तुलांची तस्करी करण्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. अटक करण्यात आलेले चौघे तरुण तुळजापूर येथिल राहणारे असून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यातील एका तरुणाच्या कुटुंबासोबत भांडण झालेल्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी ही पिस्तुले विकत घेतले असल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना पिस्तुलाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शिरपूर कडून येणाऱ्या सर्वच मार्गांवर गस्त वाढवून सापळा रचला. यावेळी सहाय्यक उपपोलीस निरीक्षक संदीप पाटीलसह भिकाजी पाटील, संजय सूर्यवंशी, संदीप पाटील, संजय भोई, कृष्णा पावरा, संतोष पाटील, मुकेश पावरा आदींनी रोहिणी भोईटी गावाजवळ सापळा लावला. यावेळेस त्यांना समोरून इर्टिगा कंपनीचे वाहन येताना दिसले. त्यांनी हे वाहन थांबवण्याचा इशारा केला. मात्र वाहनचालकाने वाहन न थांबवता शिरपूर शहराच्या दिशेने भरधाव जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस पथकाने पाठलाग करून चिलारे गावाजवळ वाहनास अडवले. या वाहनातून राहुल विष्णू शिंदे (रा. मातंगनगर, तुळजापूर) अमोल रवींद्र कोरडे (रा. आनंदनगर), ओमकार गणेश रणदिवे (रा. जिजामातानगर) व सुरज महताब शेख (रा. आरळी,तालुका तुळजापूर) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता वाहनाच्या गेअर बॉक्स जवळील फायबर पार्टच्या आडोशाला लपवलेले दोन पिस्तूल आणि मॅक्झिनसह चार जिवंत काडतूस आढळून आले. ही शस्त्रे मध्य प्रदेशातील उमरटी गावातून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील राहुल विष्णू शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्याला तुळजापूर गावातील एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली होती. या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी विष्णु शिंदे यांनी पिस्तूल विकत घेतली असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर अटक केलेल्या चौघा तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत  असल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT