धुळे : मतदार मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार कुणाल पाटील. (छाया : यशवंत हरणे) 
उत्तर महाराष्ट्र

धुळे : शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वात होती. म्हणूनच धुळे बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल आहे. भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कायदे करुन बाजार समित्या आणि शेतकर्‍यांना संपविण्याचे काम चालविले आहे. भाजपाच्या कृषीविरोधी धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. गारपीठ, अवकाळी, वादळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना अद्यापही राज्यातील भाजप-शिंदे सरकारने शेतकर्‍यांना मदत जाहिर केली नाही. म्हणून धुळे बाजार समितीच्या निवडणूकीत विरोधी भाजपाच्या पॅनलला त्यांची जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने एकतेची वज्रमुठ घट्ट केली आहे, प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या मतदारांची सभा ही विजयाची मुहूर्तमेढ रोवणारीच असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य विधीमंडळ पक्षनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. दरम्यान शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल महाविकास आघाडीकडून दिले जाईल त्यामुळे मतदारांना महाविकासच्या पाठीमागे उभे रहावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीचा रविवार (दि.9) मतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नकाणे येथील दुलारी गार्डन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला काँग्रेसचे राज्य विधीमंडळ पक्षनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री रोहिदास पाटील, आ.कुणाल पाटील,माजी आ.प्रा.शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे बाजार समिती ही महाराष्ट्रातील अव्वल बाजार समिती आहे. बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या तालुक्यात शेतकर्‍यांसाठी उपबाजार समित्याही सुरु करणार होतो. गुरांचा बाजार मोठा असल्याने गुरांच्या शेणापासून प्रक्रीया उद्योग उभारण्याचा संकल्प होता.मात्र राज्यात सरकार बदलल्याने सर्वच योजनांना अडविण्याचे काम त्यांनी केले.मात्र यापुढे शेतकरी आणि व्यापारी,हमाल मापाडीच्या संकल्पनेतील उत्तम बाजार समिती घडविण्याचे काम केले जाईल. बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असणारे आणि शेतकर्‍यांचा विचार करणारेच उमेदवार उभे करणार असल्याची ग्वाही आ.पाटील यांनी यावेळी दिली. म्हणून मतदारांनी महाविकास आघाडीच्या पॅनलला विजयी करावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले.

मेळाव्यात मार्गदर्शन करतांना विधीमंडळ काँग्रेस पक्ष नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, धुळे बाजार समिती माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली असल्याने ही बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची आहे. केंद्रातील भाजप सरकारने तीन काळे कृषी कायदे केले होते त्यामुळे शेतकर्‍यांना दिर्घकाळ आंदोलन करावे लागले या आंदोलनात तब्बल 700 शेतकर्‍यांचा बळी गेला.शेतकरी विरोधी धोरण राबवून भाजपा सरकार शेतकरी आणि बाजार समित्या उध्वस्त करण्याचे काम करीत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. आज शेतकरी गारपीट, अवकाळी-वादळी पावसाच्या सकंटात सापडला आहे. तरीही भाजप-शिंदे सरकारने कोणतीही मदत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जाहिर केली नाही.त्यामुळे शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. विधीमंडळात आ.कुणाल पाटील आणि आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठविला, आज कांदा,कपाशी पिकाला भाव नाही. दुर्दैवाने गेल्या सात महिन्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. म्हणून शेतकर्‍यांनी धुळे बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपाच्या पॅनलला जागा दाखविणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहण्याचेा आवाहन विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

मेळाव्याच्या प्रारंभी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेले शेतकरी,अपघाताने मृत पावलेले शेतकरी, शहीद जवान आणि ज्ञात अज्ञात मृत्यू पावलेल्या बांधवांना सामुदायिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्यात माजी आ. प्रा. शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिवसेनेचे नेते महेश मिस्त्री, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना(उबाठा) अतुल सोनवणे, लता पाटील, अश्‍विनी कुणाल पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले, जोसेफ मलबारी, गुलाबराव कोतेकर, बाजीराव पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, साहेबराव खैरनार, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, कृषीभूषण भिका पाटील, डॉ. ममता पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, शिवसेना(उबाठा) शुभांगीताई पाटील, डॉ.अनिल भामरे, मुकटी येथील पंढरीनाथ पाटील, उपस्थित होते. सुत्रसंचालन जगदिश देवपुरकर यांनी केले तर आभार माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी मानले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT