धुळे : उमरपाटा येथे सिंगल फेसिंग लाइटचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित. समवेत आदी मान्यवर. (छाया: यशवंत हरणे)  
उत्तर महाराष्ट्र

धुळे : उमरपाटा येथे सिंगल फेसिंग लाइटचा लोकार्पण सोहळा

अंजली राऊत
धुळे : पुढारी वृत्तसेवा 
साक्री तालुक्यातील दुर्गम भागातील प्रत्येक घरापर्यंत वीज पुरवठा होईल, असे नियोजन करावे. नवीन वीज उपकेंद्रासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा आदी सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या. उमरपाटा,  येथे  शनिवारी (दि.10) 33/11 केव्हीच्या सिंगल फेसिंग लाइटचा लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार मंजुळा गावित, सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य छगन राऊत, धीरज अहिरे, उमरपाटाचे सरपंच राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, दुर्गम भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून वीज जोडणी द्यावी. त्यासाठी आवश्यक साधन सामग्रीचा प्रस्ताव सादर करावा. वीज वितरण कंपनीच्या 132 केव्ही केंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत 'नल से जल' पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर कार्यन्वित करावेत. आवश्यक तेथे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करावेत. जेणेकरून आरोग्याचे प्रश्न कमी होतील. तसेच बारमाही आणि पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करण्यात येत आहे. ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत लोकसंख्येनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत नियोजन सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे बसरावळ, खैरखुटा सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून कृषी पंपांचाही निर्णय लवकरच घेण्यात येईल. येत्या दोन वर्षात वीज, पाणी प्रश्न सोडविण्यात येतील, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. खासदार डॉ. गावित यांनी सांगितले, साक्री तालुक्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्युतीकरण योजनेत उमरपाटा आणि ब्राह्मणवेल येथे मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे आता 24 तास विजेची सुविधा मिळणार आहे. शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज पुरवठा होईल. परिसरातील धरण, लघु प्रकल्पांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होईल. परिसरातील उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या भागातील दळणवळणाच्या सुविधा, सिंचन, आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांनी सौर पंपांना प्राधान्य द्यावे, असेही  आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार गावित म्हणाल्या की, सिंगल फेसिंग योजनेमुळे परिसरातील वीज समस्या लवकरच मार्गी लागणार आहेत. आता 24 तास वीज पुरवठा होऊ शकेल. वीज वितरण कंपनीचे 132 केव्ही केंद्र पिंपळनेर येथे व्हावे म्हणून प्रस्ताव सादर केला असून आदिवासी विकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.  माजी आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा परिषद सदस्य राऊत, डॉ. तुळशीराम गावित यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. चरणमाळचे सरपंच ओंकार राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT