धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला साडेसात हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या अभियंत्यांचे नाव वैभव हिंमत अनोरे असे असून, घरकुलासाठी लाभार्थ्याला धनादेश काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत घरकुलाच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी धनादेश देण्यात येत असतो. पंचायत समिती घरकुल गृहनिर्माणचा कंत्राटी अभियंता वैभव हिंमत हालोरे (वय 25) याने तक्रारदाराकडे घरकुलाचा धनादेश काढून देण्यासाठी साडेसात हजार रुपयांची मागणी केली होती. पंचायत समितीच्या आवारात दुपारी एकला हालोरे याला लाच स्वीकारताना पथकाने ताब्यात घेतले.