धुळे (पिंपळनेर) : वृत्तसेवा
येथील मानव केंद्राजवळील नवापाडा रोडवर (एमएच ४३, एन ६००८) या कारमधून ४८ हजारांची देशी-विदेशी दारू व कार असा एक लाख २८ हजारांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास आला आहे. पिंपळनेरचे पोलिस निरीक्षक बी. एम. मालचे यांना पिंपळनेर ते नवापाडा रोडवर कारमधून देशी व विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळनेर ते नवापाडा रस्त्यावर टेंभे गावा जवळ पोलिसांना कार येताना दिसली. कारला थांबवून कार चालकाची चौकशी केली असता त्याने योगेश संजय जगताप (वय २२) रा.चिकसे, ता.साक्री असे नाव सांगितले. पोलिसांनी कारची डिक्की उघडली असता त्यात विनापरवाना देशी- विदेशी दारू मिळून आली. देशी-विदेशी दारू व कार असा एकुण एक लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतला.
ही कारवाई पो. निरीक्षक भाईदास मालचे, भूषण वाघ, शरद चवरे, प्रशांत शिंपी पोलिस कर्मचारी संदीप मोहिते, भास्कर सूर्यवंशी यांनी केली असून पुढील तपास अतुल पाटील करीत आहेत.