उत्तर महाराष्ट्र

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीची छगन भुजबळांकडून मागणी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक – मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबई ते नाशिक प्रवासासाठी पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागत होता. मात्र आता 5 ते 6 तासांहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देऊन या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. कोरोना नियंत्रणात असल्यामुळे सण-उत्सव गर्दी होणारच, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नाशिक दौर्‍यावर असलेल्या भुजबळ यांनी रविवारी (दि. 21) पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील शिवभोजन केंद्रचालक तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित असल्याकडे भुजबळ यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर बोलताना, महाविकास आघाडी सरकारने कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या हितासाठी शिवभोजन ही अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली होती. गोरगरिबांच्या हितासाठी शासनाने ही योजना सुरू ठेवावी. शिवभोजन केंद्र चालविणार्‍या संस्थांचे थकलेले अनुदान लवकरात लवकर अदा करण्याबाबत आपण अधिवेशनात मागणी करू, असेही भुजबळांनी सांगितले.

लॉकडाउनची घोषणा पंतप्रधानांची
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुठले हिंदू सण साजरे होतात की नाही, असे वाटत होते. आता सर्व सण साजरे होतील, असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून केले जात आहे. याबद्दल भुजबळांना विचारले असता, ते म्हणाले की, गेली दोन वर्षे जगभरात कोरोनाचे सावट होते. त्यामुळे कोणीही जास्त वेळ घराबाहेर पडू शकत नव्हते तसेच एकत्र येऊ शकत नव्हते. ही परिस्थिती देशात नाही, तर संपूर्ण जगभरात होती. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनीदेखील लॉकडाउनची घोषणा केली होती. सणवार साजरे करण्यासाठी खुद्द शासनाचीच नियमावली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्त्यव्यांना कुठलाही अर्थ नाही. आता कोरोना आटोक्यात आल्याने सण-उत्सवांना गर्दी होणारच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT