उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पाकिस्तानला धूळ चारणार्‍या टी-५५ रणगाड्याचे उद्या लोकार्पण

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानला धूळ चारणार्‍या, भारतीय  लष्कराच्या विजयाचे प्रतिक आणि वॉर ट्रॉफी म्हणून नाशिक महापालिकेला मिळालेल्या लेखानगर येथील टी -५५ या रणगाड्याचे लोकार्पण उदया सोमवार दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. कारगिल युद्धात महत्वपूर्ण कामगिरी बजाविणारे भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रविण तिदमे यांनी दिली.

भारतीय लष्कराच्या शौर्याची माहिती नागरिकांना व्हावी आणि तरुणांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा मिळावी यासाठी नवीन नाशिकमध्ये युद्धात वापरलेला रणगाडा बसविण्यासाठी शिवसेनेचे प्रभाग क्र. २४ चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. लष्कराने पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात वापरलेला पराक्रमी टी-५५ हा रशियन बनावटीचा रणगाडा 'वॉर ट्रॉफी' म्हणून नाशिक महानगरपालिकेला पहिल्यांदाच दिला आहे. सन १९७१ च्या युद्धात या टी-५५ रणगाड्यांनी पाकिस्तानचे ५८ रणगाडे उध्वस्त केले होते. यातील एक पराक्रमी रणगाडा जुने सिडकोचे प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर चौकात आकर्षक वाहतूक बेट तयार करून ठेवण्यात आला आहे.

भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, तोफखाना वित्त विभागाचे भारतीय रक्षा सेवा अधिकारी धनंजय सिंह, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, वसंत गीते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, शिवसेना गटनेते विलास शिंदे आदि उपस्थित राहणार आहेत. यावेळी, कारगिल युद्धात नौदलाच्या कामगिरीची माहिती निवृत्त व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे देणार असल्याचे शिवसेना नगरसेवक प्रविण तिदमे यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT