उत्तर महाराष्ट्र

तहान बेतली जिवावर! ; नाशिकमध्ये शेजमजुराचा विहिरीत बुडून मृत्यू

गणेश सोनवणे

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ठेंगोडा व आराई या गावाच्या सीमारेषेवर असलेल्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यास गेलेल्या तरुण शेतमजुराचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. 25) याबाबत सटाणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

धनंजय रमेश जाधव (20, रा. आराई) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी (दि. 24) शेतात कांदे भरण्यासाठी कामाला गेला होता. सकाळपासून कामावर गेलेल्या धनंजयने 11 वाजता सुटी घेतली होती. दरम्यान, तो घरी परतला असावा, असा अंदाज होता. परंतु, दुपारी चारच्या सुमारास शेतमालकाच्या नातेवाइकाला शेजारील विहिरीच्या पाण्यात धनंजयच्या चपला व टोपी तरंगताना आढळली. याबाबत तत्काळ आराईचे पोलिसपाटील कारभारी भदाणे यांच्यामार्फत पोलिसांना माहिती देण्यात आली. परंतु, सायंकाळपर्यंत शोध घेऊनही विहिरीत काही आढळले नाही. सोमवारी (दि. 25) सकाळपासून पट्टीच्या पोहणार्‍यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केल्यानंतर दुपारच्या सुमारास धनंजयचा मृतदेह हाती लागला. शवविच्छेदनानंतर आराई येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अविवाहित धनंजय आजी-वडील व भावासोबत राहात होता कुटुंबीयांचा चरितार्थ चालविण्यासाठी तो मोलमजुरी करीत होता.

तहान बेतली जिवावर!
कामावरून परतताना जवळपास 500 फुटांवर असलेल्या विहिरीजवळ आल्यानंतर धनंजय पाणी पिण्यासाठी थांबला होता. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने काठावर बसून हाताने भरून पाणी पिता येत असल्याने कामावरील सगळेच मजूर या ठिकाणी पाणी पितात. धनंजयही नेमका पाणी पिताना तोल जाऊन कोसळला असावा, असा कयास आहे. पोलिस नाईक व्ही. डी. वाघ अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT