नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हरियाणा येथील मेडन फार्मास्युटिकल कंपनीत तयार झालेल्या कफ सिरपमुळे (Cough Syrup) गॅम्बियामध्ये तब्बल 66 मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या कंपनीने उत्पादन भारतात कुठेही वितरित केले नसल्याने, मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, अशात अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून, ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये कफ सिरप उत्पादन कंपन्या आहेत त्यांच्या तपासणीची मोहीमच राबविली जात आहे.
मेडेन फार्मास्युटिकल कंपनीकडून चार कफ सिरप उत्पादने गॅम्बियासह पश्चिम आफि—केमध्ये वितरित केले होते. मात्र, यामुळे 66 मुले दगावल्याने, हरियाणा सरकारने याची मोठी दखल घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद आता देशात उमटत असून, वेगवेगळ्या राज्यांमध्ये सतर्कता म्हणून फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये उत्पादित केल्या जात असलेल्या कफ सिरपची चौकशी केली जात आहे. महाराष्ट्रातही आरोग्य विभागाने याबाबतचे निर्देश एफडीएला दिले असून, ज्या जिल्ह्यांमध्ये कफ सिरप (Cough Syrup) उत्पादन करणार्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, त्यांची आता सखोल चौकशी केली जात आहे.
कफ सिरपचे उत्पादन करताना डायथाइलीन ग्लाइकॉल आणि एथिलीन ग्लाइकॉलचे प्रमाण अधिक असल्यास मुलांना पोट दुखणे, उलट्या, जुलाब, लघवी न होणे, डोकेदुखी यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात सुरू होतात. तसेच किडनीच्या समस्या देखील उद्भवतात. नेमकी हीच बाब मेडन कंपनीकडून दुर्लक्षित झाल्याने त्याचे गंभीर परिणाम समोर आले आहेत.
मेडन कंपनीने उत्पादित केलेले कफ सिरप भारतात कुठेही वितरित केले नाही. तरीदेखील कफ सिरपचे उत्पादन घेणार्या कंपन्यांची सध्या सखोल तपासणी केली जात आहे. या तपासणीअंतर्गत कफ सिरपसाठी आवश्यक घटकांचा नियंत्रित वापर केला जातो काय? ही बाब प्रामुख्याने तपासली जाणार आहे. कफ सिरपमध्ये ग्लिसरीन व इतर द्रव्यांचा वापर केला जातो. त्याचे प्रमाण समतोल असायला हवे. औषधाच्या निर्मितीनंतर त्याची टेस्टिंग होते काय? ही बाबदेखील पडताळली जाणार आहे.
– विजय जाधव, सहायक आयुक्त, औषध प्रशासन