नाशिक : ज्ञानेश्वर वाघ
सध्या भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक असे चित्र असलेला प्रभाग 7 आता नव्याने प्रभाग क्रमांक 9 झाला आहे. परंतु, या प्रभागातून भाजपकडून मातब्बर असा एकही उमेदवार शिवसेना तसेच महाविकास आघाडीसमोर नसल्याने भाजपला या प्रभागात आव्हान ठरू शकते. भाजपचे तिन्ही नगरसेवक प्रभाग क्र. 10 मधून इच्छुक असल्याने भाजपला उमेदवार शोधताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
भाजपकडे प्रभाग क्र. 10 मध्ये उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सध्या नगरसेविका असलेल्या भाजपच्या हिमगौरी आडके आहेर, स्वाती भामरे, नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे या तिघांपैकी एक दोघांना प्रभाग 9 मध्ये पक्षाकडून शिफ्ट केले जाऊ शकते. कारण प्रभाग 10 मध्ये नगरसेविका वर्षा अनिल भालेराव यादेखील इच्छुक आहेत. प्रभाग 9 मध्ये महाविकास आघाडीचे नगरसेवक अजय बोरस्ते, डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे असे मातब्बर उमेदवार आहेत. यामुळे त्यांचे पॅनल तयार झाले तर भाजपलादेखील आपले बडे उमेदवार उभे करावे लागतील. त्यानुसारच भाजपकडून चाचपणी केली जात असून, विद्यमान नगरसेवकांमधूनच उमेदवारी दिली जाऊ शकते. माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे हेदेखील या प्रभागातून इच्छुक आहेत. अजय बोरस्ते आणि डॉ. हेमलता पाटील हे गेल्या चार टर्मपासून नगरसेवक म्हणून महापालिकेत कार्यरत आहेत.
प्रभाग क्र. 9 मध्ये काही भाग झोपडपट्टीचा, तर बराचसा भाग हा उच्चभ्रू लोकवस्तीचा आहे. यामुळे या ठिकाणाहून मते पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांना चांगलीच मेहनत करावी लागते. मागील काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी हा प्रभाग फायदेशीर ठरलेला आहे. याशिवाय भाजप आमदार देवयानी फरांदे याच प्रभागातील रहिवासी असल्याने भाजप उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. भाजपकडूनच आ. फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदेदेखील इच्छुक आहे. त्यामुळे खरे तर एक प्रकारे आ. फरांदे यांचीही कसोटी ठरणार आहे की, या प्रभागात भाजपचे तिन्ही नगरसेवक निवडून आले पाहिजे.
जुन्या मागण्या अजूनही तशाच :
गोदावरी नदीचा पूररेषेसंदर्भातील प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. यामुळे या भागातील गोदावरी नदीलगत असलेल्या बांधकामांना अजूनही परवानगी मिळण्यासाठी रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तर दुसरीकडे प्रभागातील गावठाण भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेली गावठाण क्लस्टर योजना मंजूर होऊनही प्रत्यक्षात उतरू शकलेली नाही. या भागात मोठ्या बाजारपेठा आणि प्रमुख शासकीय कार्यालये सर्वाधिक असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे होणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पार्किंगची समस्या दूर करणेही गरजेचे आहे.
असा आहे प्रभाग
प्रभागात राजीव गांधी भवन, पंडित कॉलनी, सुमती कॉलनी, केटीएचएम कॉलेज, मल्हारखाण, अशोकस्तंभ, पोलिस मुख्यालय, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालय, राका कॉलनी, रविवार कारंजा, टिळकवाडी व कस्तुरबानगर या परिसराचा समावेश होतो.
प्रमुख इच्छुक उमेदवार
प्रभाग क्र. 9 मधून भाजपकडून अजिंक्य फरांदे, मधुकर हिंगमिरे, संजय यादव चव्हाण, समीर शेटे, नरेंद्र पवार, प्रेरणा बेळे, शिवसेनेकडून अजय बोरस्ते, मीनल पलोड, बाळासाहेब भोसले, काँग्रेसतर्फे डॉ. हेमलता पाटील व भारती गिते तर राष्ट्रवादीकडून गोकुळ पिंगळे व युवराज पांडे हे इच्छुक आहेत. मनसेमार्फत विभागप्रमुख सत्यम खंडाळे, नीलम भुसारी, तुषार वझरे व संजय देवरे हे इच्छुक उमेदवार आहेत.
कौल कोणाला…
प्रभाग क्र. 9 मध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्येच खरे तर जोरदार टक्कर होणार आहे. यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून आतापासूनच जोरदार प्रचाराचा धडाका सुरू आहे. यापूर्वी भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आल्या आहेत. यामुळे या दोन्ही पक्षांचा गंगापूररोड हा परिसर बालेकिल्ला मानला जातो. यामुळे या दोन्ही पक्षांमध्येच मतदानांबाबत खरी स्पर्धा रंगणार असून, मतदार कुणाला कौल देणार याकडे लक्ष लागून आहे.