संगमनेरातील तरुणीवर मुंबईत अत्याचार  Pudhari File Photo
अहिल्यानगर

Sangamner Crime News : संगमनेरातील तरुणीवर मुंबईत अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून पीडित तरुणी घरातून निघाली होती

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर : तालुक्यातील तरुणीला फसवून मुंबईला नेल्यानंतर तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रोहित मधुकर दिघे (रा.तळेगाव दिघे), सौरभ अरुण शिंदे, सुरज अरुण शिंदे (दोघेही रा.घुलेवाडी, ता.संगमनेर) आणि दोन अज्ञात महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून पीडित तरुणी घरातून निघाली होती. पेपर दिल्यानंतर कॉलेजबाहेर असताना तिला अज्ञात मुलाचा फोन आला. त्याने तिला घुलेवाडी येथे एका महिलेच्या घरी येण्यास सांगितले. अगोदरच तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मुंबई येथे नेले. मालाडमधील हॉटेलमध्ये चार ते पाच दिवस डांबून ठेवण्यात आले. या दरम्यान, मुख्य संशयित आरोपीने तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि धारदार हत्याराचा धाक दाखवून अनेकदा अत्याचार केले.

पीडित तरुणीने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली असता, आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान. या कृत्यात मदत करणार्‍या महिलेने ‘तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्याचे सांगत त्यांना परत बोलावून घेतले.पिडिता व आरोपी मुंबईहून संगमनेरच्या तळेगाव दिघे येथे घरी गेले. दुसर्‍या दिवशी, आरोपीच्या आईने पीडित मुलीला पोलिस ठाण्यात बोलावून ‘माझ्या मुलाच्या बाजूने बोल, असे धमकावले. दबावाखाली येऊन मुलीने पोलिसांसमोर स्वतःच्या मर्जीने लग्न केले असून यात कोणाचाही संबंध नाही, असा लेखी जबाब दिला.

तळेगाव दिघे येथे आरोपीच्या घरी गेल्यानंतर, पीडित तरुणीला आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे जाणवले. याबाबत तिने विचारणा केली असता, ‘हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. माझे तुझ्यासोबत लग्न होण्यासाठी संबंधित महिलेला पैसे द्यायचे होते आणि ती आता तेच पैसे मागण्यासाठी येत आहे, असे तिला सांगण्यात आले. या संदर्भात तरुणीने त्या महिलेशी संपर्क साधला असता, महिलेने तिला मारहाण केली. हे पाहून काहींनी तरुणीच्या नातेवाईकांना बोलावले. पीडित तरुणीने घरी परतल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पोलिसात धाव घेत फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT