

कोपरगाव : पुणे येथे गेलेल्या डॉक्टर सूर्यवंशी कुटुंबाकडे चोरट्यांनी 3 लाख 60 हजाराची घरफोडी केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शहरातील मार्केट यार्ड परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीत डॉ. विवेकानंद सूर्यवंशी आणि प्रतिभा सुर्यवंशी हे राहतात. दि. 7 मे रोजी सकाळी सहा वाजता घराला कुलूप लावून ते कुटुंबियांसह पुणे येथे गेले होते. त्यानंतर दि. 9 मे रोजी कोपरगाव येथे आले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप कटरने तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून 60 हजार रुपयांचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच 3 लाख रुपये रोख असा एकूण 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. डॉ. सूर्यवंशी दांपत्य घरी परत आल्यावर हा प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात तीन अज्ञात आरोपी चोरी करताना दिसले.
डॉ. विवेकानंद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित परिसरात अनेक व्यापारी राहतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक जण सुट्यांमध्ये बाहेरगावी जातात. हीच संधी साधत चोरट्यांकडून रेकी करत घरफोडी करण्यात येते. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला असून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
कोपरगाव शहरात चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. दि. 18 एप्रिल रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील सचिन वॉच कंपनीमध्ये मोठी चोरी झाल्यानंतर बारा दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने बिहार राज्यातील घोडासहन येथील कुप्रसिध्द गँगला अटक केली. आरोपींकडून 10 लाख 62 हजारांचा मुद्देमालासह 100 महागडी घडयाळे जप्त केली व गँगमधील आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काल पुन्हा एकदा शहरात मोठ्या चोरीची घटना घडली.