नेवासा : तालुक्यातील इमामपूर येथे अंगावर वीज पडून एका तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गणेश शिवाजी काळे (वय 32) असे शेतकर्याचे नाव आहे.
सोमवारी (दि. 12) सकाळपासूनच अवकाळी पावसाचे वातावरण होते. तालुक्यातील काही भागात अधूनमधून पावसाची रिमझिम चालू होती. सायंकाळी सोनई, घोडेगाव, चांदा, गोणेगाव, इमामपूर, निंभारी आदी पावसाने हजेरी लावली. या दरम्यानच मृत गणेश ऊर्फ पप्पू काळे हा तरुण शेतकरी व परिसरातील आणखी सहा-सात शेतकरी, तसेच नादुरुस्त रोहित्रावरील काम करणारे पाच- सहा कामगार हे सर्व शेतातील नादुरुस्त असलेल्या रोहित्राचे राहिलेले उर्वरित काम आटोपून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास गणेश काळे याच्या अंगावर वीज कोसळली. त्याला उपचारार्थ नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. या घटनेत कामगार असलेल्या आणखी एकास विजेचा किरकोळ धक्का बसला असून, त्याची प्रकती स्थिर आहे. मृत गणेशच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, चार बहिणी असा परिवार आहे.