

Shirdi Security :
शिर्डी : साई मंदिराला उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाल्याचे दिसले. मात्र देशातील दुसर्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या साईबाबा दर्शनासाठी रोज 60 ते 70 हजार साईभक्त शिर्डीत येतात. त्याबरोबरच शिर्डी शहरातील ग्रामस्थांची 35 हजार लोकसंख्या असून कोपरगाव तालुक्यातील 9 गावे व राहाता तालुक्यातील शिर्डीसह 20 गावांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरिक्षक, चार उपनिरीक्षक व 65 पोलिस कर्मचारी अशा 77 कर्मचार्यांवर आहे. मंजूर पोलिस बळ 109 असताना तब्बल 33 कर्मचारी कमी असल्याने शिर्डीसह परिसरातील गावांची सुरक्षा देखील साईभरोसे असल्याचे पुढे आले आहे.
शिर्डी शहरासह ग्रामीण भागातील गुन्हेगारी व अवैध व्यवसाय कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन काम करताना दिसून येतात. कायम व्हिआयपीची वर्दळ, शहरात होणारे विविध मेळावे, राजकीय कार्यक्रम, साईभक्तांची गर्दी बघता पोलिस प्रशासनाने शिर्डीसाठी वाढीव मनुष्यबळ देण्याची नितांत गरज असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांमधून पुढे आली आहे.
शिर्डी शहरासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस खात्यासाठी भव्य अशा इमारती बांधुन दिल्या आहेत. त्याबरोबरच कर्मचारी यांना राहण्यासाठी सहा मजली दोन इमारती उभारल्या आहेत. तालुकास्तरावर कार्यालयासह निवास व्यवस्था फक्त शिर्डी येथे आहे. शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचार्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, या हेतुने मंत्री विखे पाटील यांनी व्यवस्था केली आहे. मात्र पोलिस कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांवर ताण येत आहे. त्यातच शिर्डी पोलिसांवर कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, बहादराबाद खुर्द, बहादराबाद बुद्रुक, शहाजापूर, जवळके, अंजनापुर वेस्ट, रांजणगाव, धोंडेवाडी अशा जवळपास 9 गावे, तसेच शिर्डी परीसरातील 20 अशा 29 गावाच्या सुरक्षेचा शिरावर भार घेऊन शिर्डी पोलिस अविरतपणे नागरिकांना सेवा देताना दिसून येत आहे.
दहा अधिकारी असून 66 पोलिस कर्मचारी यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे. यातील कार्यालयीन कामकाजासाठी दहा कर्मचारी, समन्स बजावण्यासाठी एक, वॉरंट बसवण्यासाठी एक, न्यायालयीन कामकाजाबाबत दोन, जीप चालक दोन, लॉकअप सुरक्षेसाठी एक, असे 17 कर्मचारी लागतात. त्यातच व्हिआयपी पोलिस बंदोबस्त देखील समावेश आहे. रजेवर असलेले कर्मचारी बघता 49 कर्मचार्यांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करीत आहे.
मंजूर संख्याबळ 109 असले तरी 77 अधिकारी व पोलिस कर्मचारी शिर्डीची सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. एक पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, 21 हेड कॉन्स्टेबल, पाच पोलीस नाईक, 29 कॉन्स्टेबल, 11 महिला कॉन्स्टेबल असे कर्मचारी काम करीत आहे. तर कमी उपलब्ध असलेल्या पोलीस दलात सात सहायक पोलिस निरीक्षक, दोन हेड कॉन्स्टेबल, 18 पोलिस नाईक, 13 कॉन्स्टेबल यांचे संख्याबळ कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिर्डी पोलिस स्टेशनसाठी कमी असलेली मनुष्यबळ वाढून देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी निर्णय घेण्याची गरज दिसून येत आहे.