अहिल्यानगरात हलक्या सरी; जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज   (File Photo)
अहिल्यानगर

Ahilyanagar Rain Alert: जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत ‘येलो अलर्ट’चा अंदाज

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सर्वत्र रिमझिम पावसाची नोंद झाली.

पुढारी वृत्तसेवा

yellow alert Ahilyanagar till August 15

नगर: जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, नगर शहर आणि परिसरात चौथ्या दिवशी मंगळवारी पावसाने हजेरी लावली. तीस मिनिटांच्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सर्वत्र रिमझिम पावसाची नोंद झाली. जामखेड तालुक्यात सर्वाधिक 23 मिलिमीटर पाऊस झाला. (Latest Ahilyanagar News)

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हलक्या सरी सुरु आहेत. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांत काहीसे आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातून वाहणार्‍या भीमा नदीत (दौंड पूल) 4023 क्युसेक, सीना नदीत (सीना धरण) 364 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणार्‍या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात पावसाची 30 टक्के तूट

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 242.6 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त 70 टक्के म्हणजे 171.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कर्जत तालुक्यात 100 टक्के पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात 94.8, अकोले तालुक्यात 86.3, नगर 67.4, पारनेर 77.6, जामखेड 66.4, शेवगाव 60.3, पाथर्डी 61.5, नेवासा 57.2, राहुरी 61.1, संगमनेर 81.8, कोपरगाव 59.7, श्रीरामपूर 39.8 व राहाता तालुक्यात 60.4 टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 30 टक्के पावसाची तूट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT