वांबोरी: वांबोरी येथील कुसमुडे वस्तीवरील विवाहितेवर धारदार कोयत्याने वार करून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सूत्रांकडून समजलेली हकीकत अशी की, वांबोरी गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या कुसमुडे वस्तीवर अनिल धनवटे हे आपले पत्नी, आई, मुलांसह एकत्र राहतात. यांच्या पत्नी राधिका अनिल धनवटे (वय 30) ह्या शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एकट्याच घरी होत्या. (Latest Ahilyanagar News)
यावेळी आरोपी रमेश विठ्ठल गागरे (वय 29, रा. तांदुळनेर, ता. राहुरी) हा पूर्व वैमनस्यातून मनात राग धरून धनवटे यांच्या घरी आला. तुमचे नावावरील शेत माझ्या नावावर करून दे, नाहीतर तुला मारीन, अशी धमकी दिली आणि काही कळायच्या आतच आपल्या बरोबर आणलेला कोयत्याने राधिका धनवटे यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, मानेवर चार वार केल्याचे समोर आले. तसेच हातावर पाच ते सहा घाव घालण्यात आले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिकांनी तिकडे धाव घेत राधिका यांची हल्लेखोराकडून सुटका केली.
दरम्यान घटनेनंतर पळून जाणार्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रक्तभंबाळ अवस्थेत राधिका यांना प्राथमिक उपचारासाठी वांबोरी ग्रामीण रुग्णालयात व तेथून नंतर अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पोलिसांची निष्काळजीपणा कारणीभूत...
आरोपी हा धनवटे यांच्या घरी येऊन वाद घालत असताना याबाबत वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात संपर्क करून माहिती दिली होती, असे समजते. दुर्दैवाने दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचार्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.
कदाचित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असती, तर हा प्रकार टळला असता, असे उपस्थितांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे वांबोरीसह राहुरी पोलिसांचे प्रतिमा नागरिकांच्या नजरेत मलिन झाल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
वांबोरी पोलिसाचा अजब फतवा
घटनेतील आरोपीला जखमी कुटुंबातील नागरिकांनी राहुरी पोलिस स्टेशनला हजर करावे, असा फर्मान सोडून जणू आपल्या कर्तव्याला मूठमाती देत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदचा पोलिसांना विसर पडल्याचे पहावयास मिळाले. सुमारे दोन तास आरोपी वांबोरी पोलिस दूरक्षेत्र परिसरातच बसून ठेवण्यात आला. त्यामुळे बराच वेळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसले.