पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक? Pudhari
अहिल्यानगर

Water Tax Scam: पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक?

नेवासा नगरपंचायतीकडून माहितीमध्ये विसंगती

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: नेवासा नगरपंचायतीकडून पाणीपट्टीसंदर्भातील माहितीमध्ये विसंगती आढळत आहे. नेवासा नगरपंचायतीच्या लेखी नोंदी व आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी पारदर्शक व संगणकीकरण आधारित व्यवस्थेची मागणी केली आहे. या प्रकरणात योग्य चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सन 2025 मध्ये नेवासा येथील रहिवासी राजश्री राजेंद्र पटारे यांना त्यांच्या घरी असलेल्या दोन्ही नळ कनेक्शनसाठी पाणीपट्टी आली. विशेष म्हणजे दोन्हीही पावत्यांमध्ये नोंद पाऊण इंची नळ कनेक्शनची होती, जरी त्यापैकी एक कनेक्शन सन 2018-19 मध्येच बंद करण्यात आल्याचे नगरपंचायतीच्या नोंदीत स्पष्ट करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर राजश्री पटारे यांनी नगरपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली असून, ऑडिट अहवाल व नोंदवहीतील विसंगतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. (Latest Ahilyanagar News)

राजश्री पटारे यांच्या निवेदनानुसार, त्यांच्या घरी पूर्वी दोन नळ कनेक्शन होते-एक अर्धा इंची आणि दुसरा पाऊण इंची. सन 2018-19 मध्ये पाऊण इंची नळ बंद करण्यात आला असून, याची नोंद नगरपंचायत कार्यालयात झाली आहे. तथापि, या कनेक्शनबाबतच्या लेखी नोंदीत व अहवालांमध्ये विसंगती आढळून आल्या.

पटारे यांनी 22 मे 2025 रोजी 2017-18 ते 2025-26 या कालावधीतील पाणीपट्टीसंबंधीचे ऑडिट अहवाल मागवले होते. त्यावर नगरपंचायतीने 5 जून 2025 रोजी उत्तर दिले. परंतु त्या उत्तरात 2018-19 आणि 2019-20 चे ऑडिट अहवाल अनुपस्थित होते. शिवाय, 2017-18 च्या अहवालात दुसर्‍या नळ कनेक्शनबाबतची ओळ संपूर्ण रिकामे असून, उर्वरित माहिती हस्तलिखित स्वरूपात आढळून आली.

यानंतर 18 जुलै 2025 रोजी त्यांनी दुसरा अर्ज करून नळकनेक्शन घेतल्यापासून 2025 पर्यंतचा संपूर्ण तपशील, तसेच नळपट्टी भरण्याचे पावतीचे प्रत मागितल्या. नगरपंचायतीने 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या उत्तरात संगणकावर टाईप केलेली माहिती दिली. मात्र, अधिकृत ऑडिट बुकची प्रत न देता, दोन वेगळ्या कालावधीतील दोन कनेक्शनचे तपशील अपूर्ण स्वरूपात दिले गेले.

गेल्या 30 जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राजश्री पटारे स्वतः नगरपंचायतीत जाऊन ऑडिट रिपोर्ट तपासण्यासाठी गेले असता, 2018-19 च्या ऑडिट अहवालात नोंद आढळली की दुसरा नळ कनेक्शन 2017 पासून बंद करण्यात आला आहे. मात्र, 2016-17 चा अहवाल पुन्हा एकदा रिकामा आढळला आणि उर्वरित नोंदी हाताने लिहिल्या असल्याचे स्पष्ट झाले. पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

जो खातेदार तक्रार करतो किंवा हिशेेबावर आक्षेप घेतो. त्या तक्रारदाराचा हिशेब खाते वहीत खाडाखोड करून जुळवला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या प्रकरणात योग्य चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नेवासा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दहा दिवसाला पाणी अन् वर्षभराची पट्टी!

नगरपंचायत 10 दिवसाला पाणी सोडून वर्षभराची करपट्टी घेते आणि 24 टक्केव्याज घेते व्याज घेतल्याशिवाय उतारे देत नाही, हा तर नगरपंचायत मनमानी कारभार आहे, हे थांबले नाही, तर नेवासकर कुठल्याही प्रकारचे कर भरणार नाही, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजूम पटेल यांनी सांगितले.

फक्त नागरिकांनाच नियम

नगरपंचायत ही नागरीकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. सगळे नियम नागरिकांनी पाळायचे आहेत. नगरपंचायतीला मात्र काहीच नियमावली लागू नाही. अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी नगरपंचायत म्हणजे धर्मशाळाच आहे. कामचुकार आणि घोटाळेबाज अधिकार्‍यांचा भरणा आहे. वसुली विभागात फार मोठा गैरव्यवहार आहे. ताळेबंद लागत नाही. नोंदवहीत परस्पर फेरफार केली जात आहे. त्रययस्थ संस्थेकडून या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT