Water Crisis Pudhari
अहिल्यानगर

Water Scarcity Management: अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी ३० सप्टेंबरपर्यंत राखीव; विखे पाटील यांचे निर्देश

जिल्ह्यातील जलसाठ्यांचे नव्याने नियोजन, १६२ गावांना टँकरने पाणीपुरवठा; चारा उपलब्धतेचे पुन्हा सर्वेक्षण होणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: यंदा ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे पाऊस लांबण्‍याची शक्‍यता धरून जिल्‍ह्‍यातील धरणे व इतर जलसाठ्यांमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या पाण्‍याचे नियोजन आता ३० सप्‍टेंबरपर्यंत करण्‍याचे निर्देश देण्यात आले असून, पिण्‍यासाठी पाणी आरक्षित राहणार असल्‍याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले. दरम्‍यान, सध्‍या चारा पुरेसा आहे, मात्र अशा परिस्‍थितीतही पुन्‍हा सर्वेक्षण करण्‍याचे निर्देश दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पालकमंत्री विखे पाटील यांनी शुक्रवारी (दि.१९) जिल्‍हाधिकारी कार्यालयात आषाढी एकादशीनिमित्त नियोजन आढावा तसेच टंचाई आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपी सीईओ आनंद भंडारी, भाजपचे नेते विनायक देशमुख आदी उपस्‍थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्‍हणाले की, यंदा ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे पावसाचे प्रमाण कमी असण्‍याची शक्‍यता आहे. पाऊस लांबल्‍यास टंचाई परिस्‍थिती अधिक तीव्र होण्‍याची शक्‍यता आहे. सध्‍या जिल्ह्यातील १६२ गावांतील ९०८ वाड्या-वस्त्यांवर १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाऊस लांबल्यास टँकरच्‍या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३१ ऑगस्‍टपर्यंत उपलब्‍ध पाण्‍याचे नियोजन करण्‍याचे निर्देश दिले होते. आता ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्याचे निर्देश जलसंपदा व इतर विभागांच्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत.

अशा परिस्‍थितीत जिल्‍ह्‍्यात पुरेसा चारा उपलब्‍ध असून, कृषी व पशुसंवर्धन विभागाला पुन्‍हा जिल्‍हाभरातील उपलब्‍ध चार्‍याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्‍या गावांत लोकसंख्‍येनुसार पाणी क्षमतेच्‍या टाक्‍या उपलब्‍ध केल्‍या जातील. या टाक्‍यांमध्‍येच पाणी टाकण्‍यात यावे. या टाक्‍यांसाठी जिल्‍हा नियोजन विभागाकडून निधी उपलब्‍ध करण्‍यात येणार असल्‍याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

‘ते’ खासदार खर्‍या शिवसेनेत गेले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सहा खासदार बाहेर पडले. याच्‍याशी भाजपचा कोणताही संबंध नाही. उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍याचे काम करीत आहेत. त्‍यामुळे हे खासदार खर्‍या शिवसेनेत गेले आहेत, असे पालकमंत्री विखे पाटील म्‍हणाले. उबाठामध्‍ये आता एकटे संजय राऊतच राहतील, असा चिमटाही विखे पाटील यांनी काढला. पश्चिम बंगाल दहशतमुक्‍त राज्‍य झाले आहे. माजी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी आता मूळ काँग्रेसमध्‍ये जातील अशी चर्चा जोर धरत असल्‍याचेही विखे पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

टंचाईमुळे दिंडीतील संख्‍या कमी करण्‍याचे आवाहन

आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांसाठी टँकरची व्‍यवस्‍था केली जाणार आहे. सध्‍या अल निनोचा प्रभाव आहे. त्‍यामुळे पाऊस न झाल्‍यास टंचाई परिस्‍थितीत वारकर्‍यांना टँकरने पाणी पुरवणे अवघड होणार आहे. टंचाई परिस्‍थितीचा विचार करुन शक्‍यतो दिंडीत वारकरी संख्‍या जेवढी कमी राहील तेवढे चांगले. त्‍यामुळे पाणीपुरवठा व इतर सुविधा पुरविण्‍यास अडचण येणार नसल्‍याचे पालकमंत्री विखे पाटील म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT