

नगर: जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या ‘ज्ञानेश्वर’ सहकारी कारखान्याच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. घुले बंधूंनी सर्वांना विश्वासात घेत सर्व 21 जागा बिनविरोध काढून घेतल्या. तर दुसरीकडे ‘वृद्धेश्वर’ कारखान्यातही अपेक्षेप्रमाणे राजळेंचेच वर्चस्व दिसले. मात्र, विरोधी शिवशंकर राजळे यांनी माघार न घेतल्याने तेथे दोन जागांसाठी दि. 26 जूनला निवडणूक होत आहे.’
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. कारखान्याच्या १९ जागांपैकी १७ जागांवर राजळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून केवळ कासार पिंपळगाव गटातील दोन जागांसाठीच निवडणूक होणार आहे. त्यामुळे गेल्या चार टर्मपासून कायम असलेली बिनविरोध निवडणुकीची ‘परंपरा’ यंदा खंडित झाल्याचे दिसले.
कारखान्याच्या १९ जागांसाठी एकूण ४१ उमेदवारांनी ४४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी २४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव नाईक यांनी जाहीर केले.
राजळे गटाने यापूर्वीच्या चारही टर्ममध्ये निवडणुका बिनविरोध करण्यात यश मिळविले होते. मात्र यंदा कासार पिंपळगाव गटातून शिवशंकर राजळे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक अटळ ठरली. शिवशंकर राजळे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने निवडणुकीचे चित्र कायम राहिले. त्यामुळे आता कासार पिंपळगाव गटातील दोन जागांसाठी माजी आमदार तथा विद्यमान कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, संचालक उद्धव वाघ आणि शिवशंकर राजळे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. विरोधी गटाकडून शिवशंकर राजळे हे एकमेव उमेदवार रिंगणात असल्याने या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कासार पिंपळगाव गटातील दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. कारखान्याच्या सेवा सोसायटी मतदारसंघातील ६७ मतदार वगळता उर्वरित ८ हजार ७०८ मतदार येत्या २६ जून रोजी बॅलेट पेपरद्वारे मतदान करणार आहेत.
१४ अनुभवी चेहरे
बिनविरोध निवडून आलेल्या १७ पैकी १४ संचालक यापूर्वीही संचालक मंडळावर कार्यरत होते. तीन नव्या चेहऱ्यांना या वेळी संधी देत नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याचा प्रयत्न राजळे गटाने केला आहे.
श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होत असलेली निवडणूक अखेर काल बिनविरोध पार पडली. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सर्व गटांतील उमेदवारांची संख्या २१ जागांसाठी २१ इतकीच राहिल्याने निवडणुकीची औपचारिकता पूर्ण झाली. यामुळे माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाने पुन्हा एकदा कारखान्यावर आपले वर्चस्व राखल्याचे स्पष्ट झाले.
आमदार विठ्ठलराव लंघे व सहकाऱ्यांनी ज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु गुरुवारी (दि.१८) अर्ज माघारीच्या दिवशी विरोधकांनी सपशेल माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. घुले गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
संचालक मंडळात नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्यासह अनुभवी नेतृत्व कायम ठेवत नव्या कार्यकर्त्यांनाही संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या निवडीमुळे आगामी काळात कारखान्याच्या विकासाबरोबरच तालुक्यातील सहकार आणि राजकारणातील समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, नव्यांना संधी की पुन्हा जुन्यांचा बोलबाला? या दैनिक पुढारीने (दि. १७) प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत जणू कारखान्याच्या निवडणुकीत जवळपास १३ नव्या युवा चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले.
सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक बिनविरोध : घुले
संघटनेवर विश्वास ठेवून अर्ज मागे घेतलेल्या सहकार्यांमुळे हे निवडणूक बिनविरोध झाली. सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या सूचना व कल्पना विचारात घेऊन मार्गक्रमण करू. संपूर्ण आशिया खंडात अल निनोचे संकट आहे, या नैसर्गिक अडचणीतून मार्ग काढत ऊस उत्पादनवाढीसाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. ऊसाला चांगला भाव आणि वेळेत पेमेंट देण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही नरेंद्र घुले यांनी दिली.
तानवडेंना संधी; अन् कारखाना बिनविरोध
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महिला राखीव गटातून पिंगेवाडीच्या रंजना अशोक तानवडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. एका जागेसाठी निवडणूक होण्याची शक्यता असताना माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी समन्वयाची भूमिका घेत तानवडे यांना संधी दिली.
बिनविरोध विजयी उमेदवार
सर्वसाधारण मतदारसंघ : सुभाष बाबुराव ताठे, अनिल शिवाजी फलके, श्रीकांत एकनाथ मिसाळ, नारायण लक्ष्मण काकडे, बाबासाहेब रंगनाथ किलबिले, रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत, यशवंत निवृत्ती गवळी, सुरेश एकनाथ आठरे, शेषराव सूर्यभान ढाकणे, बाळासाहेब भगवान गोल्हार.
सहकारी संस्था मतदारसंघ : राहुल आप्पासाहेब राजळे.
अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ : काकासाहेब मुरलीधर शिंदे.
महिला राखीव मतदारसंघ : सिंधूबाई महादेव जायभाय, मोनिका राजीव राजळे.
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ : बापूसाहेब पाराजी पाटेकर.
विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघ : संदीप बाजीराव लोखंडे.
शेवगाव गट : सुधाकर नारायणराव नरवडे, पंडित रामभाऊ भोसले, रामनाथ नामदेव राजपुरे.
शहरटाकळी गट : नरेंद्र मारुतराव घुले, चंद्रशेखर मारुतराव घुले, बाळासाहेब बापुसाहेब खरड.
कुकाणा गट : नारायण कारभारी म्हस्के, हिम्मतसिंह देसाई देशमुख, अमोल विठ्ठल अभंग.
नेवासा गट : जनार्दन कचरू शेळके, दादासाहेब गुलाबराव कोकणे.
वडाळा गट : जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे.
ढोरजळगाव गट : मच्छिंद्र सुर्यभान म्हस्के, गोरक्षनाथ विठ्ठल भेडेकर.
सहकारी संस्था प्रतिनिधी : बबनराव मुरलीधर भुसारी.
अनुसूचित जाती-जमाती : विकास चंद्रभान नन्नवरे.
महिला राखीव : सुमनबाई दत्तात्रय काळे, रंजना अशोक तानवडे.
इतर मागासवर्ग : संतोष शंकरराव पावसे.
वि.जा.भ.ज./विमाप्र : अशोक लक्ष्मण मिसाळ.