बोधेगाव : वंजारी समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे आणि समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागण्यांसाठी वाडगाव (ता. शेवगाव) येथे तीन जणांचे उपोषण दहा दिवसांपासून सुरू असतानाच, त्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (दि. 10) तेथील ग्रामस्थांसह महिलांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनीची धावपळ उडाली. तब्बल तीन तास चाललेले हे आंदोलन ‘जिल्हाधिकारी उद्या (शनिवारी) भेट देणार,’ या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.(Latest Ahilyanagar News)
वंजारी समाजाला आरक्षणासाठी वडगाव येथे परमेश्वर ऊर्फ पप्पू केदार, डॉ. अभिजीत गिते आणि युवराज जवरे हे युवक दहा दिवसांपासून कानिफनाथ मंदिरात उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ परिसरातून समाजबांधव वडगाव येथे जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर वडगाव व थाटे परिसरातील वंजारी समाजाच्या महिलांसह दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी तेथील पाझर तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. सुमारे पाच ते सहा फूट खोल पाण्यात मोठ्या संख्येने महिला उभ्या राहिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
प्रांताधिकारी प्रसाद मते, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलक महिलांची बराच वेळ समजूत काढली. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. ‘जिल्हाधिकारी उद्या (शनिवारी) भेट देणार असल्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. सुमारे पाचशे ते सहाशे लोकसंख्या असलेल्या वाडगावाला आंदोलनामुळे यात्रेचे स्वरूप आले आहे. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहता काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत जादा कुमक मागवली होती.
दरम्यान, वंजारी आरक्षणाच्या मागणीसाठी बोधेगाव येथे नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याप्रश्नी शेजारील कोनोशी येथील अमोल दौंड या युवकाने आत्महत्या केल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यातच वडगाव येथील उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.