ढोरजळगाव: माझी वसुंधरा अभियानात सलग तीन वर्षे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त वाघोली (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायतीने नागरिकांकडील विविध थकबाकीची वसुली शंभर टक्के व वेळेत पूर्ण करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आर्थिक वर्षातील पाणीपट्टी, घरपट्टी व थकबाकी वसूल करणारी ती तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
ग्रामविकासाचे संकल्पक उमेश भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली ग्रामपंचायतीने गेल्या दहा वर्षांपासून राबवलेल्या विविध रचनात्मक उपक्रमामुळे आणि पर्यावरण क्षेत्रातील विशेष योगदानामुळे गावाने माझी वसुंधरा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात राज्यस्तरावर लौकिक प्राप्त केला आहे. विशेषतः वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अपारंपरिक उर्जास्रोत, शाश्वत जलस्रोतनिर्मिती, शिक्षण, आरोग्य, विषमुक्त शेती आदींच्या माध्यमातून दुष्काळी गावाची ओळख पुसून हरितग्राम ही नवी ओळख निर्माण केली आहे. मात्र, गावच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक शिस्त महत्त्वाची मानली जाते.
सरपंच सुश्मिता भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठोस निर्णयामुळे व महिनाभरापासून राबवलेल्या उपक्रमामुळे गावाने 100 टक्के थकबाकीची वसुली करण्यात यश मिळाले आहे. विविध करांच्या स्वरूपात असलेली ही थकबाकी वसूल करण्यासाठी सरपंच भालसिंग, उपसरपंच कल्पना भालसिंग व ग्रामसेवक जनाताई फटाले, तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. नागरिकांना कर भरण्याचे महत्त्व समजावून सांगत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पाणीपट्टी 50 टक्के सवलत देण्यात आली. त्यास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मार्चअखेर गावातील सर्व नागरिकांनी आपल्याकडील विविध करांची थकबाकी पूर्णपणे जमा करून 100 टक्के करवसुली असणारे गाव म्हणून इतर गावांपुढे व नागरिकांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वीज व्यवस्था आदी विकासकामांना गती मिळणार असल्याचे सरपंच भालसिंग यांनी सांगितले.
आकडे बोलतात
गावातील कुटुंब संख्या: 607
ग्रामपंचायतीचे खातेदार: 658
घरपट्टी वसुली मागील: 8112 रुपये
चालू: 1,88,690 रुपये.
पाणीपट्टी वसुली मागील: 38,400 रुपये
चालू: 1,16,000 रुपये.
गाळाभाडे वसुली:12000 रुपये