करंजी: श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या मालकीची गट नंबर ३५९ आणि ३६० या जागेमध्ये इतर हक्कातील काही लोकांनी विशेषतः पुजाऱ्यांनीच वॉल कंपाऊंड करण्याचा प्रयत्न सुरू करून ही जागाच बळकावण्याचा प्रयत्न केल्याने भाविकांच्या वाहन पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात देवस्थान कमिटीने लेखी निवेदनाद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीक्षेत्र वृद्धेश्वर, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी या ठिकाणी दर महिन्याच्या अमावास्येनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर इतरही अनेक धार्मिक कार्यक्रम या देवस्थानच्या ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
येणाऱ्या भाविकांमुळे केवळ देवस्थान कमिटीलाच आर्थिक फायदा होतो असे नाही. या ठिकाणी असणाऱ्या पुजाऱ्यांनाही आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. त्यामुळे भाविकांच्या सोयी-सुविधांची देवस्थान कमिटीबरोबरच येथील पुजाऱ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. भाविकांना वाहन पार्किंगसह इतर सोयी-सुविधा व्यवस्थित उपलब्ध झाल्या नाहीत, तर भाविक त्या देवस्थानकडे फिरकत नाहीत. अशावेळी देवस्थानबरोबर पुजाऱ्यांचेही निश्चितपणे नुकसान होते.
भाविकांकडून मिळणाऱ्या दानधर्मातून देवस्थान कमिटी देवस्थानचा विकास साधते, तर पुजाऱ्यांनाही पाठपूजा केल्यानंतर दानधर्म मिळतो. त्यामुळे भाविकांची सुविधा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी भाविकांना सोयी सुविधा देणे महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींनी वाहन पार्किंगच्या जागेत कंपाउंड करण्याचा प्रयत्न केला आहे, ती जागा तात्काळ प्रशासनाने मोकळी करावी व भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागाणी वृद्धेश्वर देवस्थानकडून करण्यात आली आहे.
श्रावण महिना सुरू झाल्याने श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय व्हावी त्यांना वाहने पार्किंगला लावता येऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक इतर हक्कातील काही पुजाऱ्यांनी देवस्थानच्या पार्किंगच्या जागेत कंपाउंड करण्याचा घाट घातला असून या कृतीमुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाकडे रीतसर लेखी तक्रार केली असून जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना उद्या (दि. १५) स्वातंत्र्यदिनी भेटून तक्रार करणार आहे.गणेश पालवे, अध्यक्ष, वृद्धेश्वर देवस्थान