Sugar Factory Election Voting Pudhari
अहिल्यानगर

Sugar Factory Election Voting: वृद्धेश्वर व मुळा कारखाना निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; निकालाकडे सर्वांचे लक्ष

वृद्धेश्वरमध्ये दोन जागांसाठी प्रतिष्ठेची लढत, तर मुळा कारखान्याच्या चार जागांसाठी मतदारांचा मोठा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: श्री वृद्धेश्वर कारखान्याच्या संचालकांच्या दोन जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत एकूण ८,७०८ मतदारांपैकी ५,६८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कारखान्याच्या १९ पदांपैकी १७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून त्या सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत.

मात्र कासार पिंपळगाव गटातील दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे, उद्धव वाघ आणि शिवशंकर राजळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. शिवशंकर राजळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या गटातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आदिनाथनगर येथील हायस्कूलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी चारपर्यंत मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. अनेक सभासद ज्येष्ठ नागरिकांनी व्हीलचेअरचा आधार घेत मतदान केले.

मतदान केंद्रावर आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे आदी दिवसभर उपस्थित होते. तसेच उमेदवार शिवशंकर राजळे यांनीही मतदान केंद्रावर ठाण मांडले होते. मतमोजणी शनिवारी पाथर्डी येथे होणार आहे. निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

‘मुळा’च्या चार जागांसाठी मतदान

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या करजगाव गटातील दोन व महिला प्रतिनिधींच्या दोन जागांकरिता शुक्रवारी मुळा कारखाना कार्यस्थळावर डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मतदान झाले. मतदानासाठी दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, युवा नेते उदयन गडाख हे सकाळपासूनच मतदान केंद्राच्या बाहेर बसून होते. दुपारी चार वाजता माजी खासदार व मुळा कारखान्याचे संस्थापक यशवंतराव गडाख यांनी मतदानाचा हक्क बजावला.

स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे नेते व आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मतदान केंद्रावर भेट दिली. करजगाव गटातील सहकार पॅनलचे ज्ञानेश्वर दरंदले, चंद्रकांत टेमक, कमल दहिफळे, विमल सोनवणे व स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे किरण जाधव, नारायण डौले व गोरख जाधव हे आलेल्या सभासदांना अभिवादन करताना दिसले. प्रशासनाकडून दोन केंद्रासाठी दोन झोनल अधिकारी व प्रत्येक खोलीसाठी सहा कर्मचारी पोलिस प्रशासनाकडून दोन अधिकारी व ५० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT