श्रीगोंदा: विसापूर तलावात पाणी शिल्लक असूनही आवर्तन न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली असून, प्रशासन मात्र तांत्रिक मुद्यावर बोट ठेवत आहे.
कुकडी प्रकल्पातून ओव्हर-फ्लोचे ८०० एमसीएफटी पाणी विसापूर तलावात सोडण्यात आले होते. त्यानंतर विसापूरचे एक आवर्तन सोडण्यात आले.
मात्र, त्यानंतर तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा झाला. सध्या तलावात ५३९ एमसीएफटी म्हणजेच ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज सुमारे ४ एमसीएफटीने साठा कमी होत आहे.
माजी उपसभापती गणपतराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आ. विक्रम पाचपुते यांची भेट घेतली. ‘कुकडी’चे पाणी करमाळ्यापर्यंत पोहोचते, मग विसापूरला आवर्तन का मिळत नाही, असा प्रश्न या वेळी मांडण्यात आला. आ. पाचपुते यांनी आवर्तनाबाबत तांत्रिक मुद्दा निर्माण झाला असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन दिले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. पाचपुते व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. पाण्याची बचत करणे काळाची गरज असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. ठोस आश्वासन न मिळाल्याने विसापूर खालचा शेतकरी चिंतेत आहे.
विसापूर तलावाची साठवण क्षमता ९२२ एमसीएफटी आहे. सन १९८६मध्ये शंकरराव चव्हाण व स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते कुकडी कालव्यातून जोड कालव्याद्वारे या तलावात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर विसापूर तलाव कुकडी प्रकल्पातील साठवण तलाव बनला. पुढे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते याच तलावातून कुकडी कालव्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्याचा पूर्व भाग ओलिताखाली आला.
विसापूर तलावातून तातडीने ३०० एमसीएफटी पाणी सोडावे, कुकडी आवर्तन बंद होताना २०० एमसीएफटी पाणी विसापूरला द्यावे, तसेच तलावावरील कृषी उपसा सिंचन योजना बंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विसापूर तलावाखालील क्षेत्र कुकडी लाभक्षेत्रातील असूनही दुजाभाव केला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे .- बाळासाहेब नाहाटा, माजी सभापती, राज्य बाजार समिती