विखे-जगताप मैत्रीपर्वाचे ‘कमळ’ फुलणार? Pudhari
अहिल्यानगर

Vikhe Jagtap Alliance: विखे-जगताप मैत्रीपर्वाचे ‘कमळ’ फुलणार?

महापालिकेची प्रारूप प्रभागरचना बुधवारी जाहीर झाली आणि महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली.

पुढारी वृत्तसेवा

महापालिकेची प्रारूप प्रभागरचना बुधवारी जाहीर झाली आणि महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली. निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल, पण प्रभागांची रचना नजरेसमोर ठेवून इच्छुकांनी रणनीती आखायला सुरुवात केली नसेल, तरच नवल. त्या पार्श्वभूमीवर नव्या रचनेनुसार प्रत्येक प्रभागांचे बदललेल्या राजकीय समीकरणांचा धांडोळा... आजपासून दररोज...

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उमेदवार निश्चितीपूर्वीच ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे उमेदवार पळवलेच; शिवाय निकालातूनही वार्डावर वर्चस्व सिद्ध करून दाखविले. तेव्हा राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक निवडून आलेल्या या वार्डात यंदा मात्र उमेदवार शोधताना महाविकास आघाडीची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. (Latest Ahilyanagar News)

राज्यात महायुतीचा प्रयोग झाल्यानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीत आता भाजपची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असणार आहे. महायुती काय ते होईल, पण विखे-जगताप यांच्या मैत्रीपर्वात राष्ट्रवादीच्या मदतीनेच भाजप या वार्डात कमळ फुलविण्याची संधी सोडणार नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांचे वर्चस्व असलेला हा वार्ड. डॉ. सागर बोरुडे, मीना शिवाजी चव्हाण आणि दीपाली नितीन बारस्कर यांना सोबत घेत संपत बारस्कर यांनी वार्डात घड्याळाची टिकटिक जोरात असल्याचे दाखवून दिले. शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे गतवेळच्या निवडणुकीला सामोरे गेले होते. सर्वसाधारण महिला राखीव जागेवर दीपाली बारस्कर यांना शिवसेनेने उमेदवारी निश्चित केली असतानाही माघारीच्या काही क्षण अगोदर त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली.

त्यामुळे या जागेवर शिवसेनेला उमेदवारच मिळाला नाही. भाजपच्या विद्या दगडे आणि मनसेच्या सविता रोडे यांनी दीपाली बारस्कर यांच्या विरुद्ध, तर भाजपकडून शारदा दिगंबर ढवण, शिवसेनेकडून दमयंती नांगरे, मनसेच्या शांता शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या मीना चव्हाण यांच्या विरुद्ध लढत दिली. संपत बारस्करांविरुद्ध भाजपचे संदीप कुलकर्णी व शिवसेनेचे चंद्रकांत बारस्कर, तर डॉ. सागर बोरुडे यांच्या विरुद्ध भाजपचे अशोक कानडे, सेनेचे हेलन पाटोळे आणि मनसेचे नितीन शिरसाठ यांनी ही निवडणूक लढविली होती. या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक विजयी झाले होते.

आता राजकीय परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची मैत्री पाहता यंदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात तह होण्याची शक्यता दिसते.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी या वार्डात त्यांच्याच मदतीने कमळ फुलवण्याची संधी भाजप सोडणार नाही, असा अंदाज बांधला जात आहे. गतवेळी पराभूत झालेल्या शारदा ढवण किंवा त्यांचे दीर भाजपकडून दावेदार मानले जातात.

तीन जागा राष्ट्रवादीला सोडून त्या बदल्यात विजयाची खात्री असलेली एक जागा पदरात पाडून घेतली, तरी भाजपसाठी ते पुरेसे आहे. अर्थात राष्ट्रवादी या तहाला संमती देईल असे नाही; पण मग दिगंबर (महाराज) ढवण यांच्या निधनानंतर होणार्‍या या पहिल्याच निवडणुकीत ढवण कुटुंबीयांच्या राजकीय पुनर्वसनाचा निर्णयही भाजपला घ्यावा लागणार आहे. तो काय असेल हे यथावकाश समोर येईलच.

संपत बारस्कर हे राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष आहेत. गतवेळी सहकारी उमेदवारांचा शोधही त्यांनीच घेतला होता. शिवसेनेचे डॉ. सागर बोरुडे यांना सोबत घेत राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. शिवाजी चव्हाण हा नवा चेहरा समोर आणत त्यांच्या पत्नी मीना यांना उमेदवारी दिली.

संपत बारस्कर यांनी प्रतिष्ठा पणाला लावत स्वत:सोबतच उर्वरित तिन्ही उमेदवारांना विजयी करून दाखविले. त्यातूनच बारस्कर पुढे आ. संग्राम जगताप यांचे विश्वासू आणि निष्ठावंत म्हणून पुढे आले. आता त्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीची शहराची धुरा आहे. त्यामुळे ते सांगतील त्यालाच राष्ट्रवादीची उमेदवारी असेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

आता राहिला प्रश्न तो राष्ट्रवादीच्या विरोधात लढणार कोण, याचा. गेल्या पाच वर्षांत नवनिर्माणाधीन वसाहती व तेथील विकासाचा प्रश्न सोडविणार्‍या राष्ट्रवादी नगरसेवकांविरुद्ध कोणी मातब्बर महाविकास आघाडीच्या गळाला लागेल, अशी शक्यता आज तरी धूसरच; पण निवडणूक एकतर्फी होऊ न देता नवखा चेहरा समोर करून महाविकास आघाडी लढत देईल, असे चित्र आहे. अर्थात उमेदवार शोधताना काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांची पुरती दमछाक होण्याची चिन्हे आज तरी दिसत आहेत.

नगरसेवकांपेक्षा यंत्रणाच जोमात!

गेल्या वेळच्या प्रभागातून लेखानगर, गावडे मळा परिसराचा काही भाग तोडून, नागापूरचा काही भाग या प्रभागाला जोडला गेला आहे. नव्या जोडलेल्या भागावर संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे नवी प्रभागरचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे.

वार्डात अनेक रस्ते काँक्रीटीकरण झाले तरी नव्याने निर्माण झालेल्या बहुतांश वसाहतींमध्ये अजूनही रस्ते, पाणी, पथदिव्यांसोबतच विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांना या समस्यांना तोंड द्यावे लागेल. चार वर्षांत नगरसेवक वार्डात फारसे फिरकले नसले, तरी त्यांची यंत्रणा मात्र कमालीची कार्यरत होती, हाच काय तो राष्ट्रवादीला दिलासा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT