श्रीरामपूर: ग्रामीण भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा शहरी भागातील एकल महिलांचे देखील सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय मिशन वात्सल्य योजना समिती व अहिल्यानगर जिल्हा एकल महिला सक्षमीकरण समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आनंद भंडारी, साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, प्रकाश इथापे, निमंत्रित सदस्य विनायक देशमुख, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे जिल्हा उद्योग केंद्राचे हवालदार जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक आशिष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम, नागरी बालविकास प्रकल्पाधिकारी राऊत, कराळे, जायभाये, कौशल्य विकास विभागाच्या शुभदा पाठक, सीवायडीए संस्थेचे संचालक मोहन कांडेकर, समर्पण सेवा फाऊंडेशनचे योगेश पिंपळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महिला व बालविकास विभाग, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या सुरू असलेले एकल महिलांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी सांगितले. 2023 मध्ये जि.प. मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणातून 1 लाख 736 एकल महिलांची माहिती संकलित झाली होती.
पण शहरी भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण आतापर्यंत जिल्ह्यात झाले नव्हते. आजच्या बैठकीतील निर्णयामुळे राज्यात सर्व प्रथम शहरी भागात एकल महिलांचे सर्वेक्षण होणार आहे. महानगरपालिका हद्दीत सुमारे 2 हजार एकल महिलांची आतापर्यंत नोंद झाल्याचे विनायक देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिका, पालिका, नगरपंचायत अशा शहरी भागात देखील एकल महिलांचे सर्वेक्षण करावे, अशी सूचना देशमुख व मिलिंदकुमार साळवे यांनी केली.
राज्य सरकारने जिल्हानिहाय उमेद मॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी येथे हा मॉल प्रस्तावित असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा समन्वयक सोमनाथ जगताप यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.