नगर: अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने गट, गण रचनेस प्रारंभ झाला आहे. शासन आदेशात जामखेड आणि कर्जतला दोन गट व चार गण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ते कोणते हे समजण्यासाठी 14 जुलैपर्यंत वाट पहावी लागणार आहे. जिल्हा जिल्हा परिषदेसाठी 75 गट तर चौदा पंचायत समितींसाठी 150 गण निश्चत करण्यात आले आहेत. गट, गणांच्या प्रारूपची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकार्यांवर सोपवण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेची गत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी 73 गट व 146 गण होते. लोकनियुक्त मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने कारभार प्रशासकामार्फत सुरू आहे. दिवाळीनंतर निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता व्यक्त होत असून दोन गट वाढल्याने 75 गट व 150 गणांत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Ahilyanagar News)
14 जुलै 2025 रोजी प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द होणार आहे. त्यावर 21 जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार असून, 11 ऑगस्टपर्यंत हरकती निकाली काढल्या जाणार आहेत. जिल्हाधिर्यांमार्फत 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली असून, महसूल यंत्रणेची धावपळ वाढणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु आरक्षण आणि वाढीव गटांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2025 पर्यत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश नुकतेच दिले.
सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यापूर्वी प्रभागरचना, आरक्षण आणि मतदार यादी तयार करणे असे तीन टप्पे पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने गुरुवारी (दि.12) जिल्हा परिषद गट व पंचायत समितींच्या गणांची प्रभागरचना करण्याचे आदेश आदेश जारी केले आहेत.
गट आणि गणांच्या प्रारुप रचनेची पूर्वतयारी करण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार्यांची समिती तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
...तर अधिकारी- कर्मचार्यांवर कारवाई
प्रभागरचनेचे कामकाज गोपनीयरित्या हाताळण्यात यावे. ही माहिती सर्वसामान्य जनतेला प्रारुप प्रसिध्दीच्या वेळी पहिल्यांदा समजणार आहे. त्यापूर्वी राजकीय व्यक्ती व अन्य व्यक्तींना माहिती देता येणार नाही. या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाला दबाव टाकता येणार नाही. गोपनीयता भंग करणार्या अधिकारी-कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, असा इशारा शासनाने दिला आहे.
विभागीय आयुक्तांना ‘अंतिम’चा अधिकार
गट व गणांची प्रारुप रचना प्रसिध्दीनंतर दाखल झालेल्या हरकतींवर विभागीय आयुक्त सुनावणी घेणार आहेत. सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर विभागीय आयुक्त गट व गण अंतिम करणार आहेत. त्यामुळे प्रारुप रचनेवर हरकती दाखल करणार्यांना सुनावणीसाठी नाशिक वारी करावी लागणार आहे.
2011 च्या जनगणनेनुसार रचना
प्रभागरचना तयार करण्यासाठी 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील गट आणि गणांचे विभाजन, त्यांच्या सीमा निश्चित केल्यानंतर जिल्हाधिकारी 14 जुलै 2025 प्रारुप प्रभागरचनेची अधिसूना प्रसिध्द करणार आहेत. यासंबंधीच्या हरकती 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.
या प्राप्त हरकतींवर अभिप्राय देऊन 18 जुलैपर्यत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल होणार आहे. या प्राप्त हरकतींवर सुनावणी होणार असून, 11 ऑगस्टपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
विभागीय आयुक्तांकडून उपलब्ध झालेल्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभागरचनेच्या मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभागरचना कधी प्रसिध्द करावयाची याबाबतची तारीख शासनाने जाहीर केलेली नाही.