संगमनेर : उंबरी बाळापूर गावातील अंतर्गत वादामुळे रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविण्याचे जबाबदारीचे काम पूर्ण करण्याची संधी विखे पाटील कटुंबियांना मिळाली. भविष्यात छत्रपती शिवरायांसंदर्भातील कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे ठाम आश्वासन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईंसह सर्व पक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ व शिवप्रेमी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. महाराजांचे विचार हे बहुजन समाजाला एकत्र घेऊन चालण्याचे होते. यामुळे पुतळा उभारणीनंतर गाव विकासाच्या दिशेने नेताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन करीत, डॉ. विखे म्हणाले की, उंबरी बाळापूर गावातील नागरीकांचे अनेक वर्षांचे स्वप्न सर्व जाती - धर्माच्या माणसांच्या योगदानातून आज पूर्ण होत आहे. हे स्मारक उभे करण्यासाठी 15 ते 80 वर्षे वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाचा नसून, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे सर्व पक्षीय लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय जेव्हा असेल, तेव्हा आमच्यामध्ये जात, धर्म आणि पक्ष आडवा येणार नाही, हे सिद्ध करुन, दाखविल्याचे उद्गार डॉ. विखे यांनी काढले. दरम्यान, उंबरी बाळापूर नंतर कोल्हार व शिर्डी येथेदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारुन, शिवसृष्टी निर्माण करणार आहे, असे डॉ. विखे यांनी यावेळी सांगितले.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीवरुन उंबरी बाळापूर गावात अंतर्गत वाद उफाळले होते. जर कोणी ठराविक रक्कम देऊन शांत होत असेल तर, आमच्या पैशाची अजिबात किंमत राहणार नाही. आमच्यासाठी कार्यकर्त्याची किंमत मोठी आहे. यामुळे गाव शांत राहिले पाहिजे. या दूरदृष्टिकोनातून पुतळा उभारणीचे काम पूर्ण केले. गावातील इतर प्रश्नदेखील भविष्यात ताकदीने सोडवू. कोणताही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही.डॉ. सुजय विखे पाटील
‘हा कार्यक्रम पक्षाचा नसला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी जो निर्णय घेतील, त्याला गावकर्यांनी पाठींबा द्यावा, असे डॉ. विखे म्हणताच, सर्वांनी, ‘भारत मातेचा जयघोष करीत त्यांना पाठींबा दिला. पहेलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा यावेळी तीव्र शब्दात डॉ. विखे यांनी निषेध नोंदविला.