अहिल्यानगर

Unseasonal Rain Update: अवकाळीने खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले

पावसाचे तांडव अन् त्यातच कृषी सहायकांचा सुरू असलेला संप, यामुळे खरिपाचे संपूर्णतः नियोजन कोलमडले

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दररोज बरसत असणार्‍या अवकाळी पावसाने तालुक्यात दाणादाण उडाली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. तब्बल सोळा वर्षांनंतर मे महिन्यात पावसाचे आगमन झाले. पावसाचे तांडव अन् त्यातच कृषी सहायकांचा सुरू असलेला संप, यामुळे खरिपाचे संपूर्णतः नियोजन कोलमडले आहे. मशागतीची कामे रखडल्यामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यात सर्वत्र पावसाची दमदार बरसात सुरू आहे. रूईछत्तीशी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रथमच मेमध्ये गुणवडीमधील बंधारे पाण्याने तुडुंब भरले असून, तालुक्यातील पाण्याच्या टँकरची संख्या निम्म्याने घटली आहे. दुष्काळी अहिल्यानगर तालुक्यात फेब्रुवारी पासूनच पाणीटंचाईची जाणवत होती. पाण्याचे सर्व स्रोत आटले होते. त्यामुळे टँकरची मागणीही वाढू लागली. मात्र, मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाने दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे टँकरची मागणी घटली असली तरी शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

संततधार पावसामुळे खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. मशागतीला वेळ मिळाला नाही, तर खरीप लांबणीवर जाऊन उत्पादनात घट होण्याचा धोका वाढला आहे. रूईछत्तीशी मंडलातील गावांमध्ये शनिवारी रात्री अतिवृष्टीची नोंद झाली. गुंडेगाव, राळेगण म्हसोबा, गुणवडी, रूईछत्तीशी आदी गावांमध्ये धुवाँधार पाऊस कोसळला. गुंडेगावमध्ये झालेल्या पावसामुळे शुढळा नदीला पाणी आले. गुणवडी गावात याच नदीवरील सहा बंधारे पाण्याने तुडुंब भरले. तलावातही बर्‍यापैकी पाणी आले. हेच ओव्हरफ्लो झालेले पाणी पुढे रूई परिसरात सीना नदीपर्यंत पोहोचले.

तालुक्यात कांदा, फळबागांवर गंभीर परिणाम दिसून आले. 18 मेपासून सलग कोसळत असलेल्या वळवाच्या पावसाने शेतकर्‍यांची दैना उडवून दिली. काही भागात वादळी वारा, मुसळधार पावसाने तांडव घातले. उन्हाळी पिकांवर संक्रांत आली आहे, तर भाजीपाल्याला पावसाचा दणका बसला आहे. शेतामध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे मशागतीची कामे लांबणीवर गेली आहेत.

खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत 15 एप्रिल ते 30 जूनपर्यंत करण्यात येत असते. त्यामध्ये माती परीक्षण, प्रचार प्रसिद्धी मोहीम, बीज प्रक्रिया, हुमणी अळी प्रात्यक्षिक, फळबाग रोजगार हमी योजनेची तयारी, गाव बैठका घेऊन नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांना सांगणे अशा विविध मोहिमा राबविल्या जातात. परंतु सद्यस्थितीत पाच मेपासून कृषी सहायकांचा संप सुरू आहे. त्यातच कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकारी यांच्या संघटना देखील संपात सहभागी झाल्याने शेतकर्‍यांची सर्व कामे खोळंबली आहेत.

वळवाच्या पावसाने चालू वर्षी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले. कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत द्या.
आबासाहेब सोनवणे, माजी सरपंच, हिंगणगाव

तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस (मि.मी.)

नालेगाव -15 .3, सावेडी 35, कापूरवाडी 17.3, केडगाव 28.3, भिंगार 51.8, नागापूर 24, जेऊर 35.8, चिचोंडी पाटील 60.3, वाळकी 44, चास 30.3, रूईछत्तीशी 92, नेप्ती 33.8.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT