शशिकांत पवार
नगर तालुका : नगर तालुक्यात सर्वदूर अवकाळी पावसाने थैमान घातले असून, फळबागांसह कांदा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात सर्वच भागांत कमी अधिक प्रमाणात बरसणार्या अवकाळी पावसाने बळीराजांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. काही भागात खरीप पूर्व मशागतीची तयारी शेतकर्यांकडून सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वारा... विजांचा कडकडाट... अन् बरसणारा अवकाळी पाऊस... यामुळे आंबा, डाळिंब फळ उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढलेला कांदा भिजल्याने कांद्याचा अक्षरशः लाल चिखल झाला आहे. कांद्याच्या वखारीवरील पत्रे उडाल्याने वखारीतील कांदा भिजण्याचे प्रकार देखील पाहावयास मिळाले. (Ahilyanagar news Update)
अनेक भागात जनावरांचे गोठे, तसेच घरांवरील पत्रे उडून गेले, तर विजेच्या तारा तुटल्याने वीज देखील गायब झाली. मंगळवारी ( दि.20 ) झालेल्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. नगर तालुक्यात सरासरी 56 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडून गेली. तालुक्यात सलग तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस विविध भागात बरसत आहे.
तालुक्याच्या पुर्व पट्ट्यात असणार्या जेऊर परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी पाणीटंचाईचा विचार करता लवकर कांद्याची लागवड केली होती. त्यामुळे या भागात तुरळक प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांशी शेतकर्यांनी कांदा काढून वखारी मध्ये टाकला आहे. परंतु दक्षिण पट्ट्यातील वाळकी, गुंडेगाव, अकोळनेर, चास, रुईछत्तीसी, सारोळा कासार तसेच चिचोंडी पाटील, देहरे, हिंगणगाव, नेप्ती या भागात मोठ्या प्रमाणात कांदा व फळबागांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतकर्यांनी खरीप पूर्व शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे. खरीप पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला असला, तरी आगामी मृग नक्षत्रात बरसणार्या पावसावरच पेरणीचे गणित अवलंबून राहणार आहे.
वाळकी, रुईछत्तीशी, चास, नेप्ती या मंडळांमध्ये अधिक पावसाची नोंद झाली आहे. याच पट्ट्यात बळीराजाचे देखील मोठे नुकसान झाले. कृषी विभागामार्फत नुकसानीची पाहणी करण्यात आली असली तरी पंचनामे करून मदत कधी मिळणार? असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. शेतकर्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित कांदा पिकावरच अवलंबून असते. कांद्याचे बाजार भाव गडगडले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीने शेतकर्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगर तालुका कांदा उत्पादनासाठी अग्रेसर म्हणून ओळखला जातो. रब्बीतील गावरान कांद्याची सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. जेऊर पट्ट्यात पाणीटंचाईमुळे कांद्याचे क्षेत्र घटले होते. मात्र, इतरत्र मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली होती. दुष्काळी परिस्थितीत जीवापाड जपलेल्या कांदा पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला असून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.
नालेगाव 47 मिलिमीटर, सावेडी 67, कापूरवाडी 43.5,केडगाव 85.5, भिंगार 9, नागापूर 56.5, जेऊर 26.3, चिचोंडी पाटील 34, वाळकी 81.3, रूईछत्तीशी 56.8, नेप्ती 99.3, चास 75.5, सरासरी पाऊस 56 मिलिमीटर.