Umed Abhiyan Fund Inquiry Pudhari
अहिल्यानगर

Umed Abhiyan Fund Inquiry: ग्रामसंघाच्या खात्यातील एक लाख पुन्हा जमा!सीआरपीचे काम थांबविण्याचे सीईओंचे आदेश

दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्याचीही चौकशी सुर

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: उमेद अभियानांतर्गत कोरडगाव येथील ग्रामसंघाच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख रुपये काढल्याप्रकरणी संबंधित समूह संसाधन व्यक्तीचे (सीआरपी) काम थांबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांनी दिले आहेत. संबंधित सीआरपीने काढलेली एक लाखांची रक्कम पुन्हा ग्रामसंघाच्या बँक खात्यात जमा केली आहे.

दरम्यान, प्राथमिक तपासणीत ग्रामसंघातील एका महिला पदाधिकाऱ्यानेही स्वतःच्या नावावर निधी काढल्याचे समोर आले असून, तिच्याही व्यवहारांची चौकशी सुरू झाली आहे. कोरडगाव येथील ग्रामसंघाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भंडारी यांच्याकडे केली होती.

ग्रामसंघाच्या खात्यातील पैसे सीआरपीने काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे पथक नेमून प्राथमिक चौकशी सुरू केली.

या चौकशीत सीआरपीने ग्रामसंघाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. तक्रार झाल्यानंतर संबंधित सीआरपीने ही रक्कम पुन्हा ग्रामसंघाच्या खात्यात जमा केली. मात्र, ग्रामसंघाच्या खात्याची तपासणी करताना आणखी एका महिला पदाधिकाऱ्यानेही स्वतःच्या नावावर पैसे काढल्याचे समोर आले. या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी संबंधित महिलेला शुक्रवारी (दि. २०) पाथर्डी येथील उमेद अभियानाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

उमेद अभियानाचा निधी हा महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असताना ग्रामसंघाच्या निधीचा अशा प्रकारे वापर होत असल्याचे समोर आल्याने बचत गटांच्या महिलांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरडगावमधील प्रकरण हे केवळ हिमनगाचे टोक असून, तालुक्यातील अन्य ग्रामसंघ आणि प्रभाग संघांमधील आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्याची मागणी महिलांकडून होत आहे.

गावाची बदनामी होऊ नये म्हणून अनेक महिला उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याची चर्चा आहे. मात्र, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर काही महिला बचत गटांमधील आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेद अभियानाच्या निधीचे तालुक्यातील इतर ठिकाणचे व्यवहारही तपासले जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील उमेद अभियानाच्या कामकाजाची जिल्हा परिषदेचे अधिकारी तपासणी करतील. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- डॉ. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
कोरडगावच्या सीआरपीने ग्रामसंघातून काढलेली रक्कम पुन्हा खात्यात जमा केली आहे. ग्रामसंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांना निरोप दिला असून, त्या पाथर्डी कार्यालयात उपस्थित राहिलेल्या नाहीत. त्यांना शुक्रवारी (दि. २०) कार्यालयात बोलावले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती देता येईल.
- मेघाताई घोळवे-खेडकर, तालुका व्यवस्थापक, उमेद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT