एकरूखे : विद्युत पंप सुरु करण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या पत्नीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी पतीने पाण्यात उडी घेतली. दोघे बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी तरुणाने शेततळ्यात उडी घेतली. या घटनेत महिला वाचविण्यात यश आले, मात्र पती व तो तरुण शेततळ्यात बुडून मृत पावले. अस्तगावच्या चोळकेवाडी येथे रविवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. रामदास सखाहरी चोळके (वय 56) आणि आदेश आण्णासाहेब नळे (वय 22) अशी मृत दोघांची नावे आहेत. सुमनबाई रामदास चोळके असे बचावलेल्या महिलेचे नाव आहे.
रविवारी सकाळी 7 वाजता सुमनबाई आणि रामदास चोळके पती-पत्नी स्वमालकीच्या शेततळ्यावर विद्युतपंप सुरु करण्यासाठी जात होते. काही अंतर चालल्यानंतर सुमनबाईचा पाय शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदावरुन घसरला. पाण्यात पडल्याने त्या बुडू लागल्या. हे दृष्य पाहून पती रामदास सखाहरी चोळके यांनी क्षणाचाही विलंब न करता मोठ्याने ओरडत शेततळ्यात उडी घेतली. रामदास यांचा हा आवाज वस्तीवरील त्यांच्या सुनबाईंनी ऐकला.
त्यांनीही जोरत ओरडत प्रसंगाची कल्पना शेजारच्यांना दिली. ही घटना समजातच आदेश आण्णासाहेब नळे यांनी शेततळ्याच्या दिशेने धाव घेतली. पती पत्नी शेततळ्यात बुडत असल्याचे दिसताच क्षणाचाही विलंब न करता त्याने शेततळ्यात उडी मारली. आदेशने सुमनबाईंना ढकलत शेततळ्याच्या कडेला आणले. दरम्यान आजूबाजूचे रहिवाशी दोर घेवून तळ्यावर दाखल झाले होते. सुमनबाईंनी दोर पकडला. परंतु रामदास चोळके आणि आदेश नळे हे पोहता पोहता थकल्याने ते बुडू लागले. इतरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. या दुर्घटनेत रामदास सखाहरी चोळके आणि आदेश आण्णासाहेब नळे या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. बचावलेल्या सुमनबाईंना तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे दाखल करण्यात आले.