करंजी: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गुरुवारी आठवडे बाजारया दिवशी दुपारी दीड वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रस्त्यापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने सुमारे पाच तास वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली.तीन रुग्णवाहिकांना या वाहतूक कोंडीतुन मार्ग काढतांना एक तास लागला स्थानिक तरुण व व्यापारी उपसरपंच पंकज मगर, युवानेते भैया बोरुडे, सतीश साळवे, पिंटू परमार, प्रणील सावंत, गणेश कर्डिले, शेरखान शेख, प्रदीप ससाणे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी या तीनही रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे त्यातील रुग्णांना रुग्ण्यालयात वेळेवर उपचार होण्यास मदत झाली.
तिसगाव येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आता स्थानिक व्यवसायाला देखील मोठी अडचणीची ठरत आहे. वाहतूक कोंडीमुळे तिसगावमध्ये थांबून काही खरेदी करण्याची इच्छा असताना देखील अनेक प्रवासी सरळ पुढे निघून जातात. दर गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी छोटे-मोठे भाजी विक्रेते महामार्गावरच बसून भाजी विक्री करतात. एका बाजूच्या सर्व दुकानदाराची देखील मोठी व्यावसायिक कोंडी होत आहे. दुकानात येण्यासाठी ग्राहकाला रस्ताच उपलब्ध नसल्याने आठवडे बाजारच्या दिवशीच या सर्व दुकानदारांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
महामार्गावर भाजी विक्रेते बसत असल्याने त्यांचा जीव देखील धोक्यात घालण्याचे काम करीत आहे.त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सातत्याने तासंतास तिसगाव येथे वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रस्त्यापर्यंत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी-शेवगावमार्गे दौंडकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच नगर-मनमाड, नगर-छत्रपती संभाजीनगर हा रस्ता खराब झाल्याने अनेक वाहनचालक प्रवासी पाथर्डी-शेवगावमार्गे नगरकडे जाणे पसंत करीत आहेत, कारण या रस्त्यावर कुठेही टोल नाका नाही त्याचबरोबर रस्ता चांगला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नगर-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक मोठे प्रमाणात वाढली आहे.
त्यातच गुरुवारी भीमा कोरेगावकडे जाणाऱ्या भीमसैनिकांची संख्या मोठी असल्याने या वाहतूक कोंडीत या वाहनांची मोठी भर पडली. तिसगाव येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असताना या ठिकाणी कधीही पोलीस दिसून येत नाहीत. त्यामुळे पोलिस नेमकी तिसगावला असतात कधी? तिसगाव येथे सुरू करण्यात आलेले पोलिस मदत केंद्र नेहमी बंद असते. त्यामुळे सर्वसामान्यांना मदत करण्याचा मार्ग बंद झाला आहे का.
पोलिसांचे वेधणार लक्ष
तिसगाव येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम येथील लहान मोठ्या व्यवसायावर होत आहे. वाहतूक कोंडीमुळे मोठी दुर्घटना घडू नये, त्यासाठी स्थानिक पोलिसांनी किमान प्रत्येक गुरुवारी येथे थांबावे, यासाठी पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांना निवेदन देणार असल्याचे सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे, महेश लोखंडे,धीरज मैड,लक्ष्मण गवळी, गणेश उंडाळे, यशपाल गांधी, लक्ष्मण माने विकास सातपुते यांनी सांगितले.