राहुरी: बिनविरोध निवडणुकीच्या झालेल्या चर्चा अखेर फोल ठरत बंद पडलेल्या तनपुरे कारखान्यासाठी तीन पॅनल निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. काल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 173 पैकी 117 जणांनी माघार घेतल्यानंतर 56 उमेदवार रिंगणात उभे आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. शिवाजी कर्डिले यांच्या आदेशानंतर भाजप उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता कारखान्याच्या सत्तेसाठी जनसेवा मंडळाकडून सभापती अरुण तनपुरे, शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे, तसेच अरूण कडू, अजित कदम, अमृत धुमाळ आदींची कारखाना बचाव कृती समिती, अशी तीन पॅनल ताकद लावणार आहेत.
तनपुरे कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज असल्याने कारखान्याची एकीकडे झालेली वाताहात तर दुसरीकडे राजकीय सत्तेच्या अपेक्षा पाहता राहुरीत तनपुरे कारखान्याचे कारभारी होण्याचे स्वप्न अनेकांनी पाहिले. सुमारे 173 जण निवडणूक रिंगणात असताना बिनविरोधाची चर्चा रंगली. परंतु बिनविरोधाच्या वाटाघाटी होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अरुण तनपुरे यांनी कारखाना निवडणुकीत लक्ष घातले. तनपुरे गटाने मातब्बर उमेदवार देत पॅनल तयार केले असताना संभाजी प्रतिष्ठाणचे राजू शेटे यांनीही शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून तरुण उमेदवारांच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्याचा चंग बांधला आहे.
तनपुरे कारखाना सभासद मालकीचा ठेवत शासनाला निवडणूक घेण्यास भाग पाडत कारखाना बचाव कृती समितीने शेवटपर्यंत लढा दिला असल्याचे सांगितले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, अमृत धुमाळ, अजित कदम, पंढू तात्या पवार व त्यांच्या सहकार्यांनी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारांची टिम दिली.
दरम्यान, मागिल सत्ताधारी असलेल्या परिवर्तन पॅनलने माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले सर्व अर्ज काढून घेतले. भाजप समर्थक परिवर्तन पॅनलचे देवळाली प्रवरेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अर्ज काढून घेतल्यानंतर दुसर्याच दिवशी आ. कर्डिले यांच्या मार्गदर्शनात सर्व भाजप पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेत कारखाना संचालक पदासाठी अनेक पर्याय असल्याचे सांगितले. परिवर्तन पॅनलने विजयी होणार्या गटाला पाठबळ देऊ असे सांगितले आहे.
कारखाना बचाव कृती समितीकडून 21 जागेसाठी 14 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे कारखाना बचाव कृती समितीचा लंगडा पॅनल दिसून आला आहे. राजू शेटे यांनी निवडणूक लागण्यापूर्वीच तयारी सुरू केली होती. तर तनपुरे गटाने ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
कोल्हार गटातून अशोक उर्हे, मच्छिंद्र कोळसे, ज्ञानेश्वर कोळसे, गोरक्षनाथ घाडगे. देवळाली प्रवरा गटातून चंद्रकांत आढाव, गोरक्षनाथ चव्हाण, अरुण ढुस, आप्पासाहेब ढुस, कृष्णा मुसमाडे, गणेश मुसमाडे, सुखदेव मुसमाडे, सोमनाथ वाकडे, भारत वारुळे. टाकळीमिया गटातून मीना सुरेश करपे, ज्ञानेश्वर खुळे, सुभाष जुंद्रे, चंद्रकांत पवार, ज्ञानेश्वर पवार पोपट पोटे, संजय पोटे, सुधाकर शिंदे. आरडगाव गटातून अनिल कल्हापुरे, अरुण डोंगरे, प्रमोद तारडे, मधुकर तारळे वैशाली तारडे, दिनकर बनकर, सुनील मोरे, दत्तात्रय म्हसे. वांबोरी गटातून रावसाहेब गडाख, किसन जवरे, भास्कर ढोकणे, भास्कर सोनवणे.
राहुरी गटातून नवनाथ कोहोकडे, अरुण गाडे, कैलास गाडे, जनार्दन गाडे, सुभाष डौले, अरुण तनपुरे, राधाकिसन येवले. ब वर्ग गटातून रायभान काळे, हर्ष अरुण तनपुरे.
अनुसूचित जाती जमातीमधून हरिभाऊ खामकर, नामदेव झारेकर, अरुण ठोकळे. महिला प्रतिनिधीमधून शैलजा अमृत धुमाळ, लताबाई गुलाबराव पवार, सपना प्रकाश भुजाडी, लिलाबाई लक्ष्मण येवले, कौशल्याबाई चिमाजी शेटे, जनाबाई धोंडीराम सोनवणे. इतर मागास प्रवर्गातून दिलीप इंगळे, रावसाहेब तनपुरे, सुरेश शिरसाट. विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून अशोक तमनर, अण्णा विटनोर आदी उमेदवार रिंगणात आहेत.